मुंबईची खबर : मान्सूनच्या प्रतिक्षेत असणाऱ्या मुंबईकरांवर पाणीसंकट? कारण काय?

मुंबई तक

06 Jun 2026 (अपडेटेड: 06 Jun 2026, 03:54 PM)

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ‘मुंबई वॉटर टँकर असोसिएशन’ने 7 जूनपासून अनिश्चित काळासाठी पाणी पुरवठा सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

Mumbai News

Mumbai News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : मान्सूनच्या प्रतिक्षेत असणाऱ्या मुंबईकरांवर पाणीसंकट?

point

कारण काय?

Mumbai News : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ‘मुंबई वॉटर टँकर असोसिएशन’ने 7 जूनपासून अनिश्चित काळासाठी पाणी पुरवठा सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. असोसिएशनने शुक्रवारी (5 जून) जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, 'मुंबईतील सर्व वॉटर टँकर चालक 7 जून रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून आपले टँकर रस्त्यांवरून हटवून कामकाज पूर्णपणे बंद करतील.' या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्या, व्यावसायिक प्रतिष्ठाने, रुग्णालये, उद्योग आणि खाजगी वॉटर टँकरवर अवलंबून असणाऱ्या इतर ग्राहकांना मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

हे वाचलं का?

कारण काय?

असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय भूजल प्राधिकरणाने काही कडक नियम लागू केले जात आहेत. या नियमांमुळे टँकर चालक, विहीर मालक, रिंग-वेल चालक, बोअरवेल मालक, आरओ प्लांट चालक आणि पाणी पुरवठादार यांच्यावर अन्याय होत असून त्यांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. टँकर उद्योगाने गेल्या 80 वर्षांहून अधिक काळ मुंबईकरांची सेवा केली असून, विशेषतः पालिकेचा पाणी पुरवठा कमी असलेल्या किंवा टंचाईग्रस्त भागात लाखो नागरिकांना पाणी पोहोचवण्यात या क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. मात्र, अलीकडच्या जाचक नियमांमुळे संपूर्ण क्षेत्रावर प्रचंड दबाव आला असून व्यवसाय चालू ठेवणे अशक्य झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांसोबत व्यावहारिक आणि न्याय्य तोडगा निघत नाही, तोपर्यंत अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही, असे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा : नांदेड : मामाच्या गावी जाताना चिमुकला कारखाली चिरडला, आई अन् बापाच्या डोळ्यादेखत...

गंभीर परिणाम होण्याची शक्यता

या संपामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल टँकर चालकांनी खेद व्यक्त केला असून, सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावा, असे आवाहन केले आहे. मुंबईत सध्या मान्सूनच्या आगमनाची तयारी सुरू असली, तरी उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे अनेक भागांत अजूनही पाण्याची मोठी मागणी आहे. अशा परिस्थितीत हजारो निवासी सोसायट्या, बांधकामे, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, आरोग्य सुविधा आणि औद्योगिक वसाहती खाजगी टँकरच्या पाण्यावर अवलंबून असल्याने या संपामुळे मुंबईत दूरगामी आणि गंभीर परिणाम होऊ शकतात.

हे ही वाचा : जंतर-मंतरवरील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात काय घडतंय? दीपके काय म्हणाले?

अद्याप तोडगा नाही

टँकर असोसिएशनच्या या संप पुकारण्याच्या निर्णयावर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा तोडगा काढण्यात आलेला नाही. मात्र, जर हा संप नियोजित वेळेनुसार सुरू झाला, तर मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) अनेक भागांमध्ये पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि लाखो रहिवाशांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.