मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी उद्या (4 जुलै) आणि परवा (5 जुलै) रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी अतिअतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
ADVERTISEMENT
हवामान विभागाच्या जिल्हानिहाय अंदाजानुसार, मुंबई महानगर क्षेत्रात मान्सून आणखी सक्रिय होणार असून पुढील 48 तास नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
'रेड अलर्ट' म्हणजे काय?
रेड अलर्ट म्हणजे अत्यंत गंभीर हवामानाचा इशारा. या काळात अतिवृष्टीमुळे पुढील परिस्थिती निर्माण होऊ शकते.
- सखल भागात पाणी साचणे
- रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम
- झाडे किंवा होर्डिंग कोसळण्याचा धोका
- दरड कोसळण्याची शक्यता
- वीजपुरवठा आणि दळणवळण सेवांमध्ये अडथळे
त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा>> डोंबिवलीत मुलांना खाऊ आणण्यासाठी गेली आई, विजेच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू
शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत संबंधित भागांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. यापूर्वी पालघर आणि रायगड जिल्हा प्रशासनानेही रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. स्थानिक प्रशासनाकडून ताज्या आदेशांनुसार विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या जिल्ह्यातील अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे.
वाहतूक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत पाणी साचले होते. त्यामुळे रस्ते वाहतूक संथ झाली होती, तर काही ठिकाणी रेल्वे सेवांवरही परिणाम झाला होता. पुढील दोन दिवसही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
हे ही वाचा>> मुंबईकरांनो सावधान, पावसाची बॅटिंग सुरुच, पुढील 3 तास महत्त्वाचे, IMD चा इशारा
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
- अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका.
- हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
- सखल भाग आणि समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहा.
- मोबाईल पूर्ण चार्ज ठेवावा आणि आवश्यक वस्तूंचा साठा करून ठेवावा.
- पूरग्रस्त किंवा पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळा.
पुढील काही दिवस पाऊस कायम
IMD च्या अंदाजानुसार, शनिवार आणि रविवारी अतिवृष्टीची शक्यता कायम असून त्यानंतरही मुंबई परिसरात जोरदार पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT












