धक्कादायक! नागपुरात आई-वडिलांनी पोटच्या 12 वर्षीय मुलाला साखळी अन् कुलपाने बांधून ठेवलं, अंगावर जखमा

Nagpur Crime News : एका दाम्पत्याने स्वत:च्या 12 वर्षीय पोटच्या मुलाला हात-पायांना साखळी व कुलूप लावून बांधून ठेवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष वागणुकीमुळे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मुलाच्या हातांवर व पायांवर गंभीर जखमा झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

Nagpur Crime News

Nagpur Crime News

मुंबई तक

03 Jan 2026 (अपडेटेड: 03 Jan 2026, 10:32 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नागपुरात धक्कादायक घटना उघडकीस

point

आई-वडिलांनी पोटच्या 12 वर्षीय मुलाला साखळी अन् कुलपाने बांधून ठेवलं

point

सातत्याने बांधून ठेवल्यानं अंगावर जखमा

नागपूर : आई-वडिलांच्या मायेच्या सावलीत वाढायला हवं असलेलं बालपण, क्रौर्याच्या छायेखाली गेल्याची धक्कादायक घटना नागपुरातून समोर आली आहे. एका दाम्पत्याने स्वत:च्या 12 वर्षीय पोटच्या मुलाला हात-पायांना साखळी व कुलूप लावून बांधून ठेवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष वागणुकीमुळे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मुलाच्या हातांवर व पायांवर गंभीर जखमा झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अजनी पोलिस ठाण्यात संबंधित पालकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाचे आई-वडील दोघेही मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. दिवसभर घरात कुणीही मोठे नसल्याने मुलगा हट्टीपणा करतो, चुकीचे वागतो, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, मुलाच्या वागणुकीत सुधारणा करण्याऐवजी त्यांनी थेट क्रूर मार्ग स्वीकारला. रोज कामावर जाताना मुलाच्या हात-पायांना साखळी लावून कुलूप बंद करायचे आणि संध्याकाळी कामावरून परतल्यावर त्याला मोकळे करायचे, असा हा धक्कादायक प्रकार अनेक दिवस सुरू होता.

हेही वाचा : मुंबई Tak महाचावडी: अमराठी Vote Bank असताना BJP मुंबईचं मराठीपण टिकवू शकेल का? पाहा CM फडणवीसांचं उत्तर काय

या अमानुष शिक्षेमुळे मुलाला शारीरिक वेदनांसोबतच मानसिक त्रासही सहन करावा लागत होता. साखळीच्या घर्षणामुळे त्याच्या अंगावर जखमा, ओरखडे पडले असून, तो सतत भीतीच्या छायेत वावरत होता. मात्र, हा प्रकार बाहेर कुणाला कळू नये, याची काळजी पालक घेत असल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर मिळताच जिल्हा बाल संरक्षण कक्षाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. संबंधित पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता, घरात एक भयभीत, थरथर कापणारा मुलगा आढळून आला. त्याच्या हात-पायांवरील जखमा पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. तातडीने मुलाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

या घटनेनंतर बालहक्क कार्यकर्ते व सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुलांच्या संगोपनात शिस्त आवश्यक असली, तरी अमानुष शिक्षा कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाही, असे मत व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालकांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे समाजात पालकत्व, मुलांचे हक्क आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई Tak महाचावडी: अमराठी Vote Bank असताना BJP मुंबईचं मराठीपण टिकवू शकेल का? पाहा CM फडणवीसांचं उत्तर काय

    follow whatsapp