Nashik Trimbakeshwar Road : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडच्या विकासाचे काम सुरू आहे. मात्र, या कामादरम्यान सिमेंटचा थर टाकल्यानंतर रस्त्याची स्वच्छता आणि देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. श्रावण मास आणि सुट्ट्यांमुळे या मार्गावर भाविकांची मोठी गर्दी होत असताना रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'मांसाहारींना घर नाही, शाकाहारींचे स्वागत', जाहिरातीवरून अमित ठाकरेंनी ब्रोकरची केली कानउघडणी
वाहनचालकांसाठी हा मार्ग घसरगुंडीप्रमाणे झाल्याचे चित्र
रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे वाहनचालकांसाठी हा मार्ग घसरगुंडीप्रमाणे झाल्याचे चित्र दिसत आहे. या परिस्थितीत अनेक वाहनचालकांना अपघातांचा सामना करावा लागला असून, सुमारे 50 ते 60 वाहनचालक जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे विकासकाम सुरू असलेल्या या मार्गावर रस्त्याची स्वच्छता आणि देखभाल याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा : 'मांसाहारींना घर नाही, शाकाहारींचे स्वागत', जाहिरातीवरून अमित ठाकरेंनी ब्रोकरची केली कानउघडणी
मंत्री गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण
या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, सुमारे 25 ठिकाणी काम झाले असून, त्यातील 50 बाय 25 फूट एवढा रस्त्याचा थोडा भाग खराब झाला होता किंवा उखडला होता. मात्र, रस्त्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रस्त्याच्या कामाची तपासणी आयआयटी आणि टाटा कंपनीकडून होत असल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितले. ट्रायपार्टीकडून तपासणी सुरू असून गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जात नसल्याचे त्यांनी म्हटले. कंत्राटदाराकडून चांगले काम करून घेतले जात असून कंत्राटदारही चांगले काम करत असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील सध्याच्या परिस्थितीवरून नागरिकांकडून उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर मंत्री महाजन यांनी रस्त्याच्या गुणवत्तेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ADVERTISEMENT












