Mumbai News : मध्य रेल्वेने विनातिकीट आणि अनधिकृत प्रवासाविरुद्ध 'झिरो टॉलरन्स' धोरण स्वीकारत तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. प्रामाणिक प्रवाशांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि सन्मानजनक व्हावा, या उद्देशाने प्रशासनाकडून गाड्यांमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर सातत्याने तपासणी केली जात आहे. या मोहिमेमुळे नियमबाह्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मोठा चाप बसला असून रेल्वेच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली आहे.
ADVERTISEMENT
दररोज विनातिकीट 13 हजार प्रवासी
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जुलै 2026 या चार महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेने एकूण 15.46 लाख अनधिकृत प्रवासाची प्रकरणे नोंदवली आहेत. मागील वर्षाच्या याच कालावधीतील (एप्रिल-जुलै 2025) 14.42 लाख प्रकरणांच्या तुलनेत यामध्ये 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. या तपासणी मोहिमेमुळे दररोज सरासरी 13 हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली जात आहे.
हे ही वाचा : पतीचा तिरस्कार अन् 'चमन'वर जीव जडला, 5 लाखांची डील अन् कोणाची झाली हत्या?
100 कोटींहून अधिक वसुली
या कारवाईतून मध्य रेल्वेने एप्रिल ते जुलै 2026 दरम्यान तब्बल 121.32 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. मागील वर्षी एप्रिल ते जुलै 2025 या कालावधीत 86.73 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. त्या तुलनेत यंदा दंडाच्या रकमेत तब्बल 40 टक्क्यांची घवघवीत वाढ नोंदवण्यात आली असून, दररोज सरासरी 1 कोटी रुपयांहून अधिक दंडाची वसुली झाली आहे.
हे ही वाचा : चार महिन्यांवर लग्न आलं, पण असं काही घडलं की दोघांचा मृतदेह आढळला
रेल्वेचे प्रवाशांना आवाहन
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी कोणताही त्रास टाळण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी नेहमी वैध तिकिटासहच प्रवास करावा. अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी येणाऱ्या काळातही ही तपासणी मोहीम अशीच कडक रीतीने सुरू राहील, असा स्पष्ट इशारा मध्य रेल्वेने दिला आहे.
ADVERTISEMENT












