धमतरी: छत्तीसगडमधील बस्तरच्या निसर्गरम्य परिसराची सफर करण्यासाठी मुंबईहून बाइकवर निघालेल्या रायडर्सच्या ग्रुपमधील 24 वर्षीय रिद्धी ठक्कर हिचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला. धमतरी जिल्ह्यातील एनएच-30 वरील मरकाटोला घाटाजवळ भरधाव ट्रेलरने तिच्या बाइकला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान रिद्धीचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
23 बाइक रायडर्सचा ग्रुप निघालेला बस्तरला
रिद्धी ठक्कर ही मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात राहत होती. सुमारे 23 बाइक रायडर्सचा ग्रुप बस्तरमधील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी छत्तीसगडमध्ये आला होता. बुधवारी पहाटे सुमारे 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान ग्रुपमधील बहुतांश रायडर्स पुढे निघून गेले होते. रिद्धी काही सहकाऱ्यांसोबत मागे राहिली होती. त्याचवेळी मरकाटोला घाटाजवळ हा अपघात झाला.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, रिद्धी MH 12 SP 0835 क्रमांकाच्या बाइकवरून प्रवास करत होती. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरने तिच्या बाइकला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की रिद्धी रस्त्यावर फेकल्या गेली आणि तिला गंभीर दुखापत झाली.
हे ही वाचा>> फॉर्च्युनरचा वेग 150, मिसिंग लिंकमध्ये अपघात कसा झाला? पोलिसांनी सांगितलं...
अपघातानंतर तिच्या सहकाऱ्यांनी तातडीने मदत केली. डायल-112च्या मदतीने रिद्धीला चारामा आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी धमतरी येथील श्रीराम रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
ट्रेलर चालक अपघातानंतर फरार
अपघातानंतर ट्रेलर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांकडून आता सीसीटीव्ही फुटेज तपासून ट्रेलरची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच फरार चालकाचा शोध सुरू आहे.
हे ही वाचा>> सोलो ट्रेकवर निघालेला टेक प्रोफेशनल बेपत्ता, ड्रोनमध्ये मृतदेहासारखी वस्तू दिसली, पण..
कुटुंबीयांना माहिती
रिद्धी ठक्करच्या मृत्यूची माहिती पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. रिद्धीच्या मृत्यूची बातमी मुंबईतील कुटुंबीयांना समजल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिच्यासोबत प्रवास करणारे सहकारीही या घटनेने हादरले आहेत.
पोलिसांकडून तपास सुरू
धमतरीचे डीएसपी भानुप्रताप चंद्राकर यांनी रिद्धी ठक्कर ही मुंबईची रहिवासी असून बाइक रायडर्सच्या ग्रुपसोबत बस्तरला आल्याची माहिती दिली. मरकाटोला घाटाजवळ तिची बाइक ट्रेलरच्या धडकेत सापडली. पोलिसांनी तिच्या सहप्रवाशांचे जबाब नोंदवले असून आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माध्यमांच्या मदतीने फरार ट्रेलर व चालकाचा शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT












