RBI Recruitment: बँकिंग सेक्टरमध्ये करिअरचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून असिस्टंट (Assistant) पदाच्या तब्बल 650 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन जाहीर झालं असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार RBI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी 16 फेब्रुवारी रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 8 मार्च 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
चांगल्या पगारासह आकर्षक सुविधा
RBI असिस्टंटची नोकरी ही बँकिंग क्षेत्रातील प्रतिष्ठित एन्ट्री-लेव्हल नोकरी मानली जाते. या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना आकर्षक पगारासह मेडिकल सुविधा, प्रवास भत्ते, गृहनिर्माण भत्ते आणि इतर बऱ्याच सुविधा मिळतात. या भरतीच्या माध्यमातून देशभरातील विविध शहरांतील RBI च्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये उमेदवारांच्या नियुक्त्या केल्या जातील.
पात्रता आणि वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन (पदवी) डिग्री असणं आवश्यक आहे. जनरल प्रवर्गातील उमेदवारांनी 50 टक्के गुणांसह तसेच SC, ST आणि PwBD प्रवर्गातील उमेदवारांनी केवळ उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. याव्यरिक्त, उमेदवारांना त्या राज्यातील स्थानिक भाषेचं ज्ञान असणं देखील गरजेचं आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे अशी उमेदवारांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
हे ही वाचा: बीड: सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात स्टोरी लावल्याने दोन गटांत वाद; थेट तिघांवर चाकूने हल्ला अन् एक ठार...
कशी होईल निवड?
RBI असिस्टंट पदासाठी तीन टप्प्यांत उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. पहिल्या टप्प्यात, पूर्व परीक्षा घेतली जाईल ज्यामध्ये इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि गणित या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. त्यानंतर, मुख्य परीक्षा घेतली जाणार असून त्यामध्ये सामान्य ज्ञान आणि कंप्यूटर नॉलेजसह इतर विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. शेवटचा टप्पा भाषा चाचणी (LPT)चा असेल ज्यामध्ये उमेदवाराचं स्थानिक भाषेचं ज्ञान तपासलं जाईल.
किती मिळेल पगार?
आरबीआय असिस्टंट पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा अंदाजे 58,000 रुपये इतका एकूण पगार मिळतो, ज्याचा बेसिक पगार जवळपास 29,000 रुपये असतो आणि कपातीनंतर, जवळपास 50,000 ते 54,000 रुपये इनहँड पगार मिळतो. याव्यरिक्त, कर्मचाऱ्यांना गृह भत्ता, महागाई भत्ता, वैद्यकीय सुविधा, प्रवास भत्ता आणि इतर अनेक अतिरिक्त सुविधा देखील दिल्या जातात. मेट्रो शहरांमध्ये हा पगार आणखी जास्त असू शकतो.
हे ही वाचा: दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर जळाले, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत तपास यंत्रणांनी दिली अधिकृत माहिती
कसा कराल अर्ज?
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार RBI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन Opportunities@RBI सेक्शनमध्ये Current Vacancies मधील Assistant Recruitment 2026 लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT











