Pandharpur Accident News : पंढरपूर : पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीवरील आहिल्या पुलावर रविवारी (दि.11 जानेवारी) रात्री भीषण अपघात घडला. ट्रॅक्टर आणि कंटेनरचा ताबा सुटल्याने दोन्ही वाहने थेट पुलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण पंढरपूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील ऊसतोड कामगारांची टोळी कर्नाटकातून ऊसतोडीचे काम आटोपून ट्रॅक्टरमधून आपल्या मूळ गावी परतत होती. रात्री साडेआठच्या सुमारास ही टोळी पंढरपूर शहरातून चंद्रभागा नदी ओलांडत असताना आहिल्या पुलावर आली. याच वेळी समोरून जाणाऱ्या कंटेनरचा आणि ट्रॅक्टरचा ताबा अचानक सुटला आणि दोन्ही वाहने थेट पुलावरून खाली कोसळली.
हेही वाचा : महामुलाखत: 'बाळासाहेब गेल्यानंतर भाजपने शिवसेनेचा...', उद्धव ठाकरेंचा घणाघात, अत्यंत गंभीर आरोप
या अपघातात ट्रॅक्टरमध्ये प्रवास करणाऱ्या ऊसतोड टोळीतील तब्बल नऊ जण आणि कंटेनरमधील दोन जण असे एकूण अकरा जण पुलाखाली कोसळले. या भीषण दुर्घटनेत महादेव दिलीप काळे आणि राजू रमेश चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पुलावरून खाली कोसळलेल्या वाहनांमुळे आणि जखमींच्या आक्रोशामुळे परिसरात हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले.
अपघाताची माहिती मिळताच पंढरपूर शहर पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. गंभीर जखमींना क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढून रुग्णवाहिकेतून पंढरपूर येथील शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सोलापूर येथे पुढील उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. या अपघातात दोन लहान मुलांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर डॉक्टरांकडून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ऊसतोड कामगार हे कष्टकरी वर्गातील असल्याने या अपघाताने त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. या प्रकरणी पंढरपूर पोलिसांनी पंचनामा केला असून प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा होण्याची मागणी केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











