Chetan Agarwal Murder Case : पुण्यातील मावळ तालुक्यातील वडगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सिया गोयल आणि चेतन चौधरी प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी पार पडली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विभूते यांच्यासमोर झालेल्या या सुनावणीत न्यायालयाने पोलिसांची 3 दिवसांची वाढीव पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावत, दोन्ही आरोपींची थेट 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. यामुळे या दोन्ही आरोपींना आता पुण्याच्या येरवडा जेलमध्ये जावे लागणार असून, न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ADVERTISEMENT
कोडवर्डमधून संवाद
न्यायालयात झालेल्या युक्तिवादादरम्यान सरकारी वकील राजश्री विरकुट आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी कोर्टाला सांगितले की, पोलिसांनी सिया गोयलच्या घरातून आणखी एक नवीन मोबाईल फोन जप्त केला आहे. यापूर्वी जप्त केलेल्या फोनच्या फॉरेन्सिक अहवालातून असे समोर आले आहे की, सिया आणि चेतन हे दोघे आपापसात संवाद साधताना काही विशिष्ट 'कोडवर्ड' वापरत होते. हे कोडवर्ड कोणत्या व्यक्तीसाठी, घटनेसाठी किंवा कटासाठी वापरले गेले, हे शोधणे अत्यंत आवश्यक आहे. जर या दोघांची स्वतंत्र चौकशी केली, तर दोघेही या कोडवर्डचा वेगवेगळा अर्थ सांगून पोलिसांची दिशाभूल करू शकतात. त्यामुळे दोघांना समोरासमोर बसवून या कोडवर्डचा छडा लावण्यासाठी आणि नवीन फोनमधील डेटा विश्लेषणासाठी आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी केला.
बीड कनेक्शन समोर
याशिवाय, पोलिसांनी 31 मे ते 18 जून दरम्यानच्या 19 दिवसांच्या गुन्ह्याच्या घटनाक्रमाचा उल्लेख केला. 31 मे रोजी जेव्हा सिया पहिल्यांदा किल्ल्यावर गेली, तेव्हाच तिच्या डोक्यात हा कट शिजत होता, असा पोलिसांचा संशय आहे. 4 जून रोजी तिने तो अंमलात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु 6 जून रोजी तिच्या घरच्यांनी तिला बाली (इंडोनेशिया) ट्रिपचे नियोजन असल्यामुळे लोणावळ्याला जाण्याची परवानगी दिली नव्हती. हा बालीचा प्लॅन कॅन्सल होण्यामागे आणि या संपूर्ण कटामागे सियाच्या 'पासपोर्ट'चा मोठा संबंध आहे. तपासामध्ये सियाने आधी सांगितले होते की, तिने पासपोर्टची पाने फाडून ती फ्लश करून टाकली. मात्र, हा पासपोर्ट अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या प्रकरणात कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा (Eye Witness) नसल्यामुळे संपूर्ण केस ही परिस्थितीजन्य पुराव्यांवर अवलंबून आहे आणि म्हणूनच 6 जूनची तारीख आणि तो पासपोर्ट शोधणे पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या गुन्ह्याच्या कॉन्सपिरसीमध्ये (कटामध्ये) बीड कनेक्शन असलेला एक तिसरा माणूसही सामील असल्याचे समोर येत असून, कोडवर्ड उलगडल्यानंतर या तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग स्पष्ट होईल, असा दावा पोलिसांनी केला.
हे ही वाचा : 'नवऱ्याला मारेल त्याला एक लाख देईन..' बायकोचं चॅलेंज अन् घडलं भयंकर!
आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद
दुसऱ्या बाजूला, आरोपींच्या वकिलांनी पोलिसांच्या या मागणीला तीव्र विरोध दर्शवला. चेतन चौधरीचे वकील राधिकेश उत्तेवार यांनी आक्षेप घेतला की, पोलीस कोठडी वाढवून घेण्यासाठी पोलीस जुनेच मुद्दे पुन्हा पुन्हा मांडत आहेत. तपासात कोणतीही नवीन मोठी प्रगती झालेली नाही आणि आरोपी पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहेत, त्यामुळे कोठडी वाढवण्याची गरज नाही.
हे ही वाचा : मुंबईत मुसळधार पाऊस, पश्चिम रेल्वेकडून महत्त्वाची अपडेट जारी
नार्को टेस्टसाठी अर्ज
यानंतर सिया गोयलचे वकील विपुल दुषिंग यांनी न्यायालयात अत्यंत कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचारले की, "पोलीस आरोपींना कोठडीत ठेवून त्यांच्याकडून बळजबरीने कसली कबुलीपत्रे (Confessions) लिहून घेत आहेत का?" त्यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणात लाय डिटेक्टिंग (पॉलीग्राफ) किंवा नार्को टेस्टसाठी अर्ज केला आहे. कायदा असा सांगतो की, अशा कोणत्याही चाचणीसाठी आरोपीची स्वतःची लेखी संमती आवश्यक असते आणि ती संमती आरोपीने स्वतः खुल्या न्यायालयात न्यायाधीशांसमोर उभे राहून देणे बंधनकारक आहे. परंतु, पोलिसांनी ही संमती आरोपींकडून पोलीस कोठडीतच लिहून घेतली आहे, जी कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही.
हे ही वाचा : वाशिम : 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा, न्यायालयाचा मोठा निर्णय; नेमकं प्रकरण काय?
न्यायालयीन कोठडीत रवानगी
कायदेतज्ज्ञांचा हा युक्तिवाद न्यायालयात अत्यंत प्रभावी ठरला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलिसांची 3 दिवसांची वाढीव कोठडीची मागणी फेटाळून लावली आणि आरोपींची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. आता पोलिसांना या आरोपींची तुरुंगात जाऊन चौकशी करायची असल्यास किंवा फोनचे कोडवर्ड डीकोड करण्यासाठी त्यांची समोरासमोर चौकशी करायची असल्यास, पुन्हा रीतसर न्यायालयात अर्ज करावा लागेल. न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतरच पोलिसांना येरवडा जेलच्या जेलरची मंजुरी घेऊन तिथे तपास करता येणार आहे. दरम्यान, आरोपींच्या वकिलांकडून आता जामिनासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT












