समजून घ्या: खिडक्या आणि डबे सगळंच बदललं, स्वयंचलित बंद दरवाजाची लोकल आहे तरी कशी?

स्वयंचलित बंद दरवाजाची मुंबई लोकल सुरू केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. ज्याबाबत आता सरकार गांभीर्याने विचार करत असून अशा लोकलची रेल्वेकडून चाचणी देखील सुरू झाली आहे. समजून घ्या याचविषयी सविस्तरपणे.

samjun ghya anuja dhakras windows coaches everything has changed what exactly is mumbai local train with automatic closing doors like

समजून घ्या

अनुजा धाक्रस

• 10:11 AM • 15 Apr 2026

follow google news

मुंबई: जून 2025 मध्ये मुंबईजवळच्या मुंब्रा जवळ दरवाजात लटकत असलेल्या 5 प्रवाशांचा चालत्या लोकलमधून  पडून मृत्यू झाला. यानंतर लोकलमध्ये लटकून होणारा प्रवास, प्रवाशांची सुरक्षा यावरून सरकारला प्रश्न विचारण्यात आले. फडणवीस सरकार आणि ज्यांच्या खरं तर अंतर्गत विषय येतो त्या केंद्र सरकारकडूनही स्वयंचलित बंद दरवाजाची मुंबई लोकल सुरू केली जाईल असं आश्वासन दिलेलं. बऱ्याचदा अशी आश्वासनं हवेतच विरतात पण याबाबतीत तर तसं झालेलं नाही. मुंबईत नॉन एसी पण स्वयंचलित दरवाजाच्या नव्या मुंबई लोकल आल्या आहेत. कशा असणार आहेत या लोकल, दरवाजे बंद तर वेंटिलेशनबाबत काय खात्री बाळगण्यात आली आहे, डबे कसे असतील, तिकीट दरात बदल होणार का या सगळ्याची उत्तरं समजून घेऊयात.

हे वाचलं का?

मुंबईतल्या कुर्ला कारशेडमध्ये नॉन एसी स्वयंचलित बंद दरवाजाच्या लोकल 13 एप्रिलला दाखल झाल्या आहेत. चेन्नईतल्या ICF ने ही लोकल बनवली आहे. एसी लोकलप्रमाणेच या लोकलचे दरवाजे प्रवासादरम्यान बंद असतील जेणेकरून प्रवासी सुरक्षित राहतील. दिसायला एसी लोकलसारखीच ही लोकल दिसतेय, पण आतली सिस्टिम थोडी वेगळी आहे. 

या लोकलमध्ये नेमकं काय-काय असणार?

1. एकूण 12 डबा असतील 
2. 8 सेकंड क्लास आणि 4 फर्स्ट क्लास 
3. 5 सेकंड क्लास आणि 2 फर्स्ट क्लास महिलांसाठी राखीव
4. 5698 प्रवाशांची क्षमता, 1003 बसू शकतात, 4695 उभ्याने प्रवास करू शकतात 
5. दिव्यांगांसाठी स्वतंत्र डबा 
6. लोकलच्या सुरूवातीला आणि शेवटी लगेज डबा, ज्यात ठराविक वेळेत महिलांनाही प्रवाशाची परवानगी    

त्या पलिकडे आतून ही लोकल जशी दिसतेय, त्यामध्ये खिडक्या आता असलेल्या लोकलपेक्षा वेगळ्या आहेत. आताच्या नॉन एसी लोकलप्रमाणे छोट्या खिडक्या न ठेवता त्या मोठ्या खिडक्या आहेत, शिवाय त्याचे स्लायडिंगही काचेचे आहेत, जसे बेस्ट बसला आहेत. नॉन एसी लोकल आणि बंद दरवाजांमुळे वेंटिलेशनचा प्रश्न होता, अनेकांना शंका आहे की गुदमरल्यासारखं होईल या लोकलमध्ये, म्हणूनच या नव्या लोकलमध्ये खिडक्या मोठ्या आहेत, तसंच दरवाजांमध्येही वेंटिलेशनची सोय दिसतेय, त्यामुळे हवा खेळती राहील याची पुरेशी काळजी घेतली आहे.

हे ही वाचा>> समजून घ्या: ऑफिसमध्ये लैंगिक शोषण झालं तर नेमकं काय करायचं?

तसंच जोवर दरवाजे बंद होणार नाहीत तोवर लोकल सुरू होणार नाही अशी इंटरलॉकिंग सिस्टिम आहे, मात्र हजारो प्रवासी एकाच वेळी त्या लोकलमध्ये प्रवास करताना खरोखर हे वेंटिलेशन पुरेसं आहे का हे प्रत्यक्षात ही लोकल सेवेत येईल तेव्हाच समजू शकेल. 

लोकलचे काही डबे आतून कनेक्टेड आहेत, जसे एसी लोकलमध्ये असतात. आसन व्यवस्था पाहिली तर फर्स्ट क्लासमध्ये कूशन सीट्स आहेत, सेकंड क्लासमध्ये साध्या सीट्स आहेत. लगेजचा डबा मात्र आता एकदम प्रशस्त केला आहे, आतापेक्षा मोठा आहे. यापलिकडे आता एसी लोकल किंवा मेट्रोमध्ये सोय असते तसंच या लोकलमध्येही आपात्कालीन स्थितीत मोटरमनशी बोलता येईल असे टॉल्कबॅक आहेत.

हे ही वाचा>> 8 व्या वेतन आयोगाच्या कामकाजाला वेग, 'या' उमेदवारांना आयोगात नोकरीची संधी; 90 हजार ते 1 लाखांपर्यंत मिळणार पगार

आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ही लोकल प्रवाशांच्या सेवेत येणार कधी? तर त्यासाठी थोडी वाट आणखी पाहावी लागणार आहे, कारण अजूनही ट्रायल्स सुरू आहेत, ज्यामध्ये खासकरून वेंटिलेशनबाबतच काही तपासण्या होणं बाकी आहे. यामध्ये अजून साधारणत: 3 महिन्यांचा अवधी लागू शकतो. रेल्वेचा विचार याहून पुढचा आहे, ज्याबाबत खरतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीही माहिती दिली आहे ती म्हणजे की सर्वच लोकल एसी लोकल करून त्या माफक दरात ठेवल्या जातील. 

आताच्या घडीला एसी लोकलचं भाडं हे अनेकांना परवडणारं नाहीये. डोंबिवली ते प्रभादेवी ह्या माझ्या प्रवासाचे दर मी सांगितले तरी फर्स्ट क्लासचा एक महिन्याचा पास हा 910 रुपये आहे, आणि तोच एसी लोकलचा पास 1880 रुपये इतका आहे. केवळ दर परवडत नाहीत म्हणूनही अनेक जण एसी लोकलने प्रवास करू शकत नाहीत, परिणामी नॉन एसी लोकलमध्ये दरवाजात लटकून त्यांचा असुरक्षित प्रवास सुरू आहे. पण आता स्वयंचलित दरवाजांमुळे किमान हा प्रवास सुरक्षित होईलच, पण नॉन एसी लोकलचे दर कायम ठेवून संपूर्ण मुंबई लोकल एसी करण्याचा मानस हा रेल्वेचा आहे, अर्थात त्यासाठी 2028-29 पण उजाडू शकतं. 

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2014 ते मे 2025 या कालावधीत चालत्या लोकलमधून पडून 6 हजार 760 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, जखमींची संख्या तर 14 हजारावर आहे. त्यामुळे या नॉन एसी स्वयंचलित बंद दरवाजांच्या लोकलची गरज मुंबईला होतीच, आता ती प्रत्यक्षात सुद्धा येतेय. गंमतीत अनेक जण म्हणतात मुंबई लोकलच्या नशिबात जे काही चांगलं येतं ते पहिले पश्चिम रेल्वेला म्हणजेच western line ला मिळतं, मग सेंट्रलला आणि राहिलं तर हार्बरला... पण नॉन एसी स्वयंचलित बंद दरवाजांच्या लोकल या सगळ्यात पहिले मध्य रेल्वेवरच चालवल्या जाणार आहेत. 

तर अशी असणार आहे मुंबईतली नॉन एसी स्वयंचलित बंद दरवाजाची लोकल, अर्थात एखादी नवी गोष्ट आली की त्याचे टीकाकारही असतात आणि पुरस्कर्तेही, पण प्रवाशांच्या दृष्टीने ह्यातले कोणते काळजीचे किंवा प्रशंसेचे मुद्दे वाटतात हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.