sangli murder case : सांगलीतील विश्रामबाग परिसरात पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पतीचा झोपेतच मृत्यू झाल्याचा बनाव पत्नीने रचल्याचे तपासात उघड झाले. प्रेमविवाह करून संसार सुरू केलेल्या या दाम्पत्याला दोन मुले असूनही पत्नीने प्रियकराच्या मदतीने हे मोठं कांड केल्याचं पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.
ADVERTISEMENT
विश्रामबाग पोलिसांनी संशयाच्या आधारे केलेल्या कसून तपासानंतर या खुनाचा उलगडा झाला असून मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. आनंद हणमंत सर्जे (वय 28, रा. पोळमळा, सांगली) असे मृत पतीचे नाव आहे.
हेही वाचा : माहीम : धक्का लागल्याने चाकू हल्ला, माफी मागूनही विषय मिटला नाही; स्थानकाबाहेर काय घडलं?
आनंदच्या गळ्यावर खुणा दिसल्या अन् संशय बळावला
आनंद सर्जे हा सांगली शहरातील एका ब्रँडेड कपड्यांच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. तो पत्नी आणि दोन मुलांसह पोळमळा परिसरात राहत होता. गुरुवारी पहाटे पत्नी आणि मेहुण्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. डॉक्टरांनी याची माहिती दिल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत मृतदेहाची बारकाईने पाहणी केली. त्यावेळी आनंदच्या गळ्यावर ओरखड्यांच्या खुणा आढळल्याने पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तपासाची दिशा बदलत अधिक चौकशी सुरू केली.
हेही वाचा : RSS चं कौतुक केल्यानं काँग्रेससह राज ठाकरेंकडून टीकेची झोड, अखेर नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण
मृत्यू नैसर्गिक नसून गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट
पोलिसांनी पत्नीची कसून चौकशी केली असता तिने सुरुवातीला आनंदला मारहाण झाली होती, त्यानंतर तो घरी झोपल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र, तिच्या जबाबातील विसंगतीमुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर मृतदेह मिरजेतील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. उत्तरीय तपासणीच्या अहवालातून हा मृत्यू नैसर्गिक नसून गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या 23 वर्षीय प्रियकराला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान पत्नीने अखेर खुनाची कबुली दिली.
तपासादरम्यान पत्नीने पती दारू पिऊन मारहाण करत होता, शिवीगाळ करून सतत त्रास देत होता, अशी माहिती पोलिसांना दिली. याच कारणातून तिने प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे उघड झाले. गुरुवारी पहाटे पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाल्यानंतर तिने प्रियकराला घरी बोलावून घेतले. त्यानंतर आनंद सर्जे याचे पाय ओढणीने बांधण्यात आले आणि दोघांनी त्याच्या छातीवर बसून गळा दाबत त्याचा जीव घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.
ADVERTISEMENT











