सातारा जिल्ह्यात जलप्रलय, तब्बल 116 गावांचा संपर्क तुटला, शेकडो एकर शेती पाण्याखाली!

इम्तियाज मुजावर

07 Jul 2026 (अपडेटेड: 07 Jul 2026, 01:36 PM)

सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यात पावसाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाच्या पुढील तब्बल 116 गावांचा संपर्क या नैसर्गिक आपत्तीमुळे उर्वरित जगाशी पूर्णपणे तुटला आहे.

Satara Heavy Rains

Satara Heavy Rains

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सातारा : कांदाटी खोऱ्यात जलप्रलय

point

तब्बल 116 गावांचा संपर्क तुटला

point

शेकडो एकर शेती पाण्याखाली!

Satara Heavy Rains : सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यात पावसाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले आहे. मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाच्या पुढील तब्बल 116 गावांचा संपर्क या नैसर्गिक आपत्तीमुळे उर्वरित जगाशी पूर्णपणे तुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्या आहेत, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर रस्ते आणि पूल खचल्याने या भागातील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

हे वाचलं का?

चार दिवसांपासून 116 गावं अंधारात

कांदाटी खोऱ्यातील या दुर्गम भागात गेल्या चार दिवसांपासून भीषण परिस्थिती निर्माण झाली असून स्थानिक नागरिक वीज, मोबाईल नेटवर्क आणि दळणवळणाच्या कोणत्याही सुविधांशिवाय अंधारात दिवस काढत आहेत. संपर्काची सर्व साधने निकामी झाल्यामुळे या गावांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, याची अचूक माहिती मिळवणेही कठीण झाले आहे. या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतांमध्ये घुसल्याने शेकडो एकर भातशेती वाहून गेली असून, हाताशी आलेले पीक नष्ट झाल्याने बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे.

हे ही वाचा : रत्नागिरी : खेडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना, डोंगराचा कडा खचला अन् क्षणात सर्व काही संपलं!

पुणे, मुंबईहून आलेले पर्यटक अडकले

या नैसर्गिक संकटात केवळ स्थानिक ग्रामस्थच नाही, तर मुंबईहून पावसाळ्यासाठी आपल्या गावी आलेले अनेक लोक आणि पुण्याहून कांदाटी खोऱ्याच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आलेले असंख्य पर्यटकही अडकून पडल्याची माहिती समोर येत आहे. रस्ते बंद असल्याने आणि संपर्क यंत्रणा कोलमडल्याने या सर्वांना सुरक्षित बाहेर पडणे अशक्य झाले आहे.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यावर पावसाचं संकट, 'या' 7 जिल्ह्यांना मोठा अलर्ट

स्थानिकांची मागणी काय?

2021 सालीदेखील पुराची अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आपत्ती ओढवली आहे. या संपूर्ण स्थितीला प्रशासन जबाबदार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून प्रशासनाने तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू करून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवावे, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.