Solapur Crime ,अक्कलकोट : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट शहरात प्रेमसंबंधातून तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वामीभक्त असल्याचे भासवून एका खासगी घरात अवघ्या एका दिवसासाठी भाड्याने राहिलेल्या प्रियकरानेच आपल्या प्रेयसीचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केला. त्यानंतर आरोपीने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. सध्या त्याच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT
ही भीषण घटना 4 जानेवारी रोजी सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या दरम्यान अक्कलकोट शहरातील हद्दवाढ भागात बासलेगाव रोड परिसरात घडली. स्नेहा श्रीकांत बनसोडे (वय 20, रा. पोगुलमाळा, रामवाडी, सोलापूर) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी आदित्य रमेश चव्हाण (वय 22, रा. नागूरतांडा, ता. अक्कलकोट) याच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा आणि आदित्य यांच्यात दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते. 4 जानेवारी रोजी दोघेही बासलेगाव रोडवरील लोखंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागील पिरजादे प्लॉटमध्ये असलेल्या कोळी यांच्या घरात थांबले होते. आरोपीने स्वामिभक्त असल्याचे सांगत त्या घरात एका दिवसासाठी खोली भाड्याने घेतली होती. सकाळच्या वेळेत दोघांमध्ये वाद झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वादाचे रूपांतर हिंसाचारात होताच आरोपी आदित्यने धारदार शस्त्राने स्नेहाच्या गळ्यावर वार केला. गंभीर जखमांमुळे स्नेहाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने स्वतःच्या गळ्यावरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. रक्तस्रावामुळे तो जखमी अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी त्याला तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी यामावार यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी लक्ष्मी श्रीकांत बनसोडे (वय 40, रा. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 मधील कलम 3 (2) (व्ही) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक दीपक भिताडे करीत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











