Buldhana News: महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातून मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. एका शाळेतील विद्यार्थ्याचा त्याच्या शिक्षकाडून शाळेत आई-वडिलांविषयी अपशब्द वापरत अपमान करण्यात आला. याचा राग सहन न झाल्याने विद्यार्थ्याने स्वत:चं जीवन संपवल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील वसाडी गावात 1 जुलै रोजी ही घटना घडली आहे. संबंधित मुलाने शाळेतून परतल्यानंतर एक चिट्ठी लिहिली आणि जवळच्या शेतात जाऊन आत्महत्या केली. या प्रकरणातील मृत पावलेल्या मुलाचं नाव विनायक उर्फ विवेक महादेव राऊत असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
विवेक हा वसाडी गावातील जय हनुमान विद्यालयात दहावीत शिकणारा विद्यार्थी होता. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत पहिला तास सुरू झाला. यादरम्यान वर्गशिक्षकांनी सर्वांना प्रश्न विचारायला सुरूवात केली. विवेकला सुद्धा शिक्षकाने प्रश्न विचारले असता त्याला त्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत. यावर सरांना राग आला आणि त्या रागात ते विवेकला ओरडले आणि म्हणाले, "तुझ्या आई-वडिलांना तुझ्या अशा अभ्यासाबद्दल सांगावं लागेल. तुझं अभ्यासात लक्ष नाही. घरच्यांना बोलवून त्यांना याबद्दल सांगावं लागेल. तुझ्या आई-वडिलांनी तुला काय शिकवलं?" यासोबतच शिक्षकांनी आई-वडिलांविषयी अपशब्द उच्चारले असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: गर्लफ्रेंड म्हणाली, 'शारीरिक संबंध नको..' बॉयफ्रेंड चिडला अन् भलतंच काही तरी करून बसला!
अपमान सहन न झाल्याने...
आई-वडिलांविषयी अपशब्द वापरुन शिक्षकाने अपमान केल्याचं विवेकला सहन झालं नाही. विवेकला सरांचा प्रचंड राग आला होता. या रागात तो संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर थेट घरी न जाता जवळील शेतात गेला. त्यावेळी त्याने एक चिट्ठी लिहिली आणि गळफास घेत स्वत:चं आयुष्य संपवलं. वर्ग शिक्षक सुर्यवंशी यांनी आईवडीलांविषयी उच्चारुन अपमानित केल्याबद्दल आत्महत्या करत असल्याचं विवेकने चिट्ठीत लिहिलं.
हे ही वाचा: 'आपल्या डोक्यात हवा गेली होती, गर्विष्ट माणसाचे..', शोमधून काढल्यावर निलेश साबळेला एवढं कोणी सुनावलं?
पोलिसांचा तपास
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे. तसेच, शाळेतील व्यवस्थापन सुद्धा या घटनेचा तपास करत आहे. गावातीलच नव्हे तर जिल्ह्यातील नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक केली असल्याची माहिती तपास अधिकारी मुकेश गुर्जर यांनी दिली आहे. तसेच, सध्या आरोपीची चौकशी सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
