बहिणीने हिंदू मुलाशी लग्न केलं, शकील खानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, काय केलं?

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये आपल्या बहिणीच्या आंतरजातीय विवाहाचा राग मनात धरून मेहुण्याने आपल्या सख्ख्या भावजीवर भरदिवसा पेट्रोल पंपावर चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे.

Ulhasnagar Crime News

Ulhasnagar Crime News

मुंबई तक

12 May 2026 (अपडेटेड: 12 May 2026, 03:31 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बहिणीने हिंदू मुलाशी लग्न केलं

point

शकील खानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, काय केलं?

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या सख्ख्या बहिणीने केलेल्या प्रेमविवाहाला स्वीकारण्याऐवजी एका भावाने हिंसाचाराचा मार्ग निवडत स्वतःच्याच भावजीवर जीवघेणा हल्ला चढवला. नागेश चव्हाण असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याने एका हिंदू कुटुंबातील असूनही शकील खानच्या बहिणीशी विवाह केला होता. हा आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह शकील खानला मान्य नव्हता. याच रागातून सोमवारी रात्री जेव्हा नागेश आपली ड्युटी संपवून घरी जाण्याच्या तयारीत होता, तेव्हा ही रक्तरंजित घटना घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा :  सांगलीत चाललंय तरी काय? 15 दिवसात 3 खून, वायरमनसह कोणा-काणाची झाली हत्या?

पेट्रोल पंपावर गाठले आणि केला खुनी हल्ला

ही संपूर्ण घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 मधील एका पेट्रोल पंपावर घडली, जिथे नागेश चव्हाण कामाला आहे. ड्युटी संपवून घरी परतत असताना त्याचा साला शकील खान आपला मित्र अरबाज खान याच्यासह तिथे पोहोचला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, शकीलने कोणतीही चर्चा किंवा वाद न घालता अचानक कमरेचा चाकू काढला आणि नागेशवर वार करण्यास सुरुवात केली. संतापलेल्या शकीलने नागेशच्या पोटात चाकूने एकामागून एक अनेक वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नागेशला स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही आणि तो रक्ताच्या थारोळ्यात तिथेच कोसळला. हल्ला केल्यानंतर दोन्ही आरोपींनी तातडीने घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : सौंदर्यवतीच्या लग्नात पालकांकडून 28 लाखांचा खर्च, पण 2 महिन्यात बॉडी आली

 पोलिसांनी काही तासांतच आरोपींना ठोकल्या बेड्या; 'हिललाईन' पोलिसांची मोठी कारवाई

घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मुख्य आरोपी शकील खान आणि त्याचा साथीदार अरबाज खान या दोघांनाही अटक केली आहे. पोलीस चौकशीत शकीलने आपला गुन्हा कबूल केला असून, बहिणीने दुसऱ्या धर्मातील मुलाशी लग्न केल्यामुळे तो प्रचंड संतापलेला होता आणि याच रागातून त्याने भावजीला धडा शिकवण्यासाठी हा कट रचल्याचे सांगितले. सध्या नागेशची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातून पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे. तिथे तो मृत्यूशी झुंज देत आहे.

 सामाजिक कटुतेतून माणुसकीला बसला तडा; धार्मिक भिंती संवेदनांवर पडल्या भारी

उल्हासनगरमधील या घटनेने समाजात आजही जातीय आणि धार्मिक भिंती किती खोलवर रुजलेल्या आहेत, याचे विदारक दर्शन घडवले आहे. केवळ वेगळ्या धर्मात लग्न केले म्हणून एका तरुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न करणे, हे मानवी संवेदनांना काळं फासणारे आहे. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, सुजाण नागरिकांमधून या कृत्याचा तीव्र निषेध केला जात आहे. धार्मिक आणि सामाजिक कटुता एखाद्याच्या जीवावर कशी बेतू शकते, याचे हे ज्वलंत उदाहरण ठरले असून पोलीस प्रशासन आता या प्रकरणात कडक पावले उचलत आहे.