ulhasnagar fda police raid : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर प्रतिबंधित औषधांविरोधातील कारवाईला वेग आला असून, त्याचाच भाग म्हणून उल्हासनगरमध्ये एफडीए आणि मध्यवर्ती पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका गोठ्यावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान प्रतिबंधित ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या तब्बल 612 प्लास्टिकच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. दूध देणाऱ्या म्हशींकडून लवकर दूध उतरवण्यासाठी या इंजेक्शनचा बेकायदेशीर वापर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'जिथे तर्क आणि तथ्य असतात..', पीएम मोदींचा युवकांना संदेश; '56 वर्षीय तरुणाला' टोला
म्हशींना लवकर पान्हा फुटण्यासाठी ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा वापर
मिळालेल्या तक्रारीनुसार, मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गोठ्यात दूध देणाऱ्या म्हशींना कृत्रिमरीत्या लवकर पान्हा फुटावा यासाठी प्रतिबंधित ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा वापर केला जात होता. त्यानंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने आणि एफडीएच्या पथकाने उल्हासनगर कॅम्प-3 येथील ओटी सेक्शन, जसलोक हायस्कूलजवळ असलेल्या गोठ्यावर छापा टाकला. या कारवाईत गोठा चालक प्रकाश अमरलाल वाधवानी (वय 64) यांच्या ताब्यातून प्रतिबंधित ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या 612 प्लास्टिकच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या या इंजेक्शनची अंदाजे किंमत सुमारे 11 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात तोबा गर्दी, ड्रोनद्वारे घेतलेला व्हिडीओ पाहाच VIDEO
कृत्रिमरीत्या लवकर दूध उतरवण्यासाठी इंजेक्शनचा वापर
प्राथमिक तपासात या इंजेक्शनचा वापर म्हशींकडून कृत्रिमरीत्या लवकर दूध उतरवण्यासाठी केला जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सीआर क्रमांक 358/2026 अंतर्गत औषधे व प्रसाधने अधिनियमातील कलम 18(अ) आणि 18(सी), भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 223 तसेच पशु क्रूरता प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मध्यवर्ती पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कोबरणे, तसेच एफडीएचे औषध निरीक्षक मनीष घोतमारे आणि जोसेफ चिरमेल यांच्या संयुक्त पथकाने केली. प्रतिबंधित औषधांचा बेकायदेशीर वापर, पशूंच्या आरोग्याशी होणारी छेडछाड आणि पशु क्रूरतेच्या घटनांविरोधात भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सातत्याने सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. या कारवाईबाबत उल्हासनगरचे उपायुक्त (डीसीपी) सचिन गोरे यांनी माहिती दिली.
ADVERTISEMENT












