महाराष्ट्र हादरला, सरकारी अधिकाऱ्यासमोर RTI कार्यकर्त्याची हत्या, नेमकं प्रकरण काय?

Virar Crime News : विरारमध्ये अवैध दगड खाणींविरोधात लढा देणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली असून, खाण मालकाने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याचा आरोप आहे.

Virar Crime News

Virar Crime News

मुंबई तक

12 May 2026 (अपडेटेड: 12 May 2026, 07:08 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

विरारमध्ये अवैध खाण प्रकरण उघड करणाऱ्या RTI कार्यकर्त्याची हत्या; मृतदेह त्याच खाणीत फेकला

point

महाराष्ट्र हादरला, सरकारी अधिकाऱ्यासमोर RTI कार्यकर्त्याची हत्या

Virar Crime News : विरार पूर्वेतील शिरगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील अवैध खाणींविरोधात कायदेशीर लढा देणाऱ्या आत्माराम पाटील या आरटीआय (RTI) कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या खाणीविरोधात त्यांनी तक्रार केली होती, त्याच खाणीमध्ये त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांना त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. आरोपींनी मोठ्या दगडाने आत्माराम पाटील यांच्या डोक्यावर वार करून त्यांचा जीव घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण विरार परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून अवैध खाण माफियांविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : गर्लफ्रेंडच्या सौंदर्याची इतकी भूरळ पडली की, प्रेमात वेडा होऊन केलं भयंकर कृत्य!

तक्रारीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सरकारी अधिकाऱ्यांसमोरच हल्ला

या हत्येचा घटनाक्रम अत्यंत अंगावर शहारे आणणारा आहे. मंगळवारी दुपारी वसई तहसीलदार कार्यालयातील सर्कल अधिकारी प्रभाकर पाटील हे एका अन्य अधिकारी आणि चालकासह शिरगाव येथील तक्रारीची पाहणी करण्यासाठी गेले होते. तक्रारीची जागा आणि परिसर दाखवण्यासाठी त्यांनी आत्माराम पाटील यांना त्यांच्या घरातून सोबत घेतले होते. खाणीच्या परिसरात पोहोचताच आधीच तिथे दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळीने सर्कल अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या कानाला दुखापत झाली. जेव्हा आत्माराम पाटील हे सरकारी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावले, तेव्हा आरोपींनी त्यांना लक्ष्य केले आणि मोठ्या दगडाने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. या भीषण हल्ल्यात आत्माराम पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : बहिणीने हिंदू मुलाशी लग्न केलं, शकील खानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, काय केलं?

पाच वर्षांचा संघर्ष आणि खाण मालकाच्या धमक्या; पुतण्याने केला खळबळजनक खुलासा

विरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्माराम पाटील हे गेल्या पाच वर्षांपासून या बेकायदेशीर खाणीच्या व्यवसायाला कडाडून विरोध करत होते. खाणीत केल्या जाणाऱ्या डायनामाईट स्फोटांमुळे परिसरातील घरांना तडे जात होते आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रदूषणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले होते. आत्माराम यांचे पुतणे जयेश पाटील यांनी पोलिसांना सांगितले की, यापूर्वीही खाण मालक महेश पाटील याच्याकडून आत्माराम यांच्यावर हल्ला झाला होता. तसेच हत्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी रात्री महेश पाटीलचा मुलगा मयूर याने आत्माराम यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यावरून ही हत्या पूर्वनियोजित कटानुसार करण्यात आल्याचा संशय बळावला आहे.

 खाण मालक महेश पाटील विरोधात गुन्हा दाखल; आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचा तपास सुरू

या प्रकरणी विरार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी आणि खाण मालक महेश पाटील याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, अधिकाऱ्यावर हल्ला करणे आणि हत्येचा कट रचणे अशा विविध कलमान्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हत्येसाठी वापरलेले दगड आणि इतर पुरावे पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले आहेत. अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या एका सामान्य नागरिकाची अशा प्रकारे भरदिवसा हत्या झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा शोध घेत असून, लवकरच सर्व दोषींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

गर्लफ्रेंडच्या सौंदर्याची इतकी भूरळ पडली की, प्रेमात वेडा होऊन केलं भयंकर कृत्य!