Washim Crime : वाशिममध्ये एक हृदयद्रावक घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. घरगुती वादातून महिलेनं विहिरीत उडी घेत आपलं जीवन संपवलं आहे. तसेच तिच्या पतीने आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली असता, त्याचा देखील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही मन हेलावणारी घटना वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील सवासनी गावात घडली आहे. घरी जोडपं न परतल्याने गावकऱ्यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली होती. त्यांना विहिरीच्या कडेला चप्पला आढळल्याने भलताच संशय आला. त्यानंतर मृतदेह दिसल्याने गावकरीही हादरून गेले. आत्महत्या केलेल्या पत्नीचं नाव सीमा जगताप असे आहे, तर वाचवण्यासाठी गेलेल्या पतीचं नाव अमोल जगताप असे आहे.
ADVERTISEMENT
पत्नीला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीचा पाण्यात बुडून मृत्यू
प्राथमिक माहितीनुसार, सवासनी गावात राहत असलेल्या जगताप दाम्पत्यामध्ये काही कारणावरून वादंग निर्माण झाला होता. याच वादाचा परिणाम हा पत्नीच्या मनावर झाल्याने पत्नीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. तेव्हा तिचा पती अमोल जगताप तत्काळ तिला वाचवण्यासाठी कसलाही विचार न करता त्याने विहिरीत उडी मारली. मात्र, दोघांनाही पोहता येत नसल्याने पतीची मदत निष्फळ ठरली आणि दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
जगताप दाम्पत्य रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाही...
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत जगताप दाम्पत्य घरी न परतल्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना मध्यरात्री गावाजवळील शेजारी असलेल्या विहिरीजवळ चप्पला दिसल्या होत्या. यामुळे गावकऱ्यांना भलताच संशय बळावला गेला होता. तेव्हा स्थानिकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली होती. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास करण्यास सुरुवात केला.
तेव्हा बचाव पथक देखील त्या ठिकाणी आले आणि त्यांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. तेव्हा दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. या संपूर्ण घटनेचा तपास मंगळरुपीर पोलीस करत असून हे प्रकरण कौटुंबिक वादातूनच निर्माण झालं असल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT











