निराधार योजनेसाठी पत्नीने मृत दाखवलं, तो पती थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात...जालन्याचं प्रकरण काय?

मुंबई तक

04 Jun 2025 (अपडेटेड: 04 Jun 2025, 07:57 AM)

या तक्रारीमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, याप्रकरणी चौकशी सुरू करण्याचे संकेत तहसील कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.  

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

जालन्याच्या घणसावंगीतील धक्कादायक प्रकार

point

ज्या पतीला मृत दाखवलं तो जिवंत

point

पतीने शासनाकडे काय तक्रार केली

जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेनं आपल्या जिवंत पतीला कागदोपत्री मृत दाखवून गेल्या आठ वर्षांपासून शासनाच्या निराधार योजनेचा लाभ लाटल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. या प्रकरणी पती भिकाजी गाडे यांनी घनसावंगी तहसीलदार आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून संबंधित महिलेचे मानधन तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Maharashtra Weather: कोकणासह 'या' भागात मान्सून घालणार धुमाकूळ, हवामान विभागाचा 'या' ठिकाणी हाय अलर्ट जारी

शासनाकडून विधवा आणि निराधार महिलांना दरमहा आर्थिक अनुदान दिले जाते. मात्र, या योजनेचा गैरवापर करत सिद्धेश्वर पिंपळगाव येथील एका महिलेने आपला पती जिवंत असतानाही त्याला मृत दाखवून अनुदान मिळवल्याचा दावा भिकाजी गाडे यांनी केला आहे. या तक्रारीमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, याप्रकरणी चौकशी सुरू करण्याचे संकेत तहसील कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.  

भिकाजी गाडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, त्यांची पत्नी गेल्या आठ वर्षांपासून निराधार योजनेच्या नावाखाली अनुदान घेत आहे. हा प्रकार उघडकीस आणत त्यांनी तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईची विनंती केली आहे. या घटनेमुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी आणि गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  

हे ही वाचा >> हात-पाय बांधून मारहाण, सोल्डरींग मशिनने चटके! 25 लाखाची मागणी करत सुनेला छळणाऱ्या 6 जणांना...​​​​​

प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, लवकरच याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रकार परिसरात चर्चेचा विषय ठरला असून, योजनेच्या लाभार्थ्यांच्या पडताळणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.