रोहित वाळके, अहिल्यानगर: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी बारामतीतील तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल 92 लाख 9 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याशिवाय मोबाइल फोन, कार आणि बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
500 रुपयांच्या 18 हजार 419 बनावट नोटा
पोलिसांच्या माहितीनुसार, या कारवाईत 500 रुपयांच्या 18 हजार 419 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटांची एकूण दर्शनी किंमत 92 लाख 9 हजार 500 रुपये आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला गणेश शेवाळे हा आपल्या साथीदारांसह बनावट नोटा वापरण्याच्या उद्देशाने जवळ बाळगत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित ठिकाणी छापा टाकला.
पायऱ्यांखाली सापडली बनावट नोटांची बॅग
पोलिसांनी ठिकाणाची झडती घेतली असता पायऱ्यांच्या खाली ठेवलेल्या एका पिशवीत बनावट नोटा आढळून आल्या. याशिवाय बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे कोऱ्या कागदाचे बंडलही पोलिसांच्या हाती लागले.
हे ही वाचा>> पाठीवर टॅटू, विषारी मशरुमचा प्लॅन... एक नाही अनेक भयंकर गोष्टींचं प्लॅनिंग, केतनला संपवण्यासाठी सियाच्या डोक्यात होत्या भलत्याच गोष्टी
या कारवाईत पोलिसांनी गणेश दिलीप शेवाळे, सुमित विकास चंदनशिवे आणि सुरज वसंत कांबळे या तिघांना अटक केली आहे.
1 कोटी 3 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून एकूण 1 कोटी 3 लाख 74 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 92 लाख 9 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटांसोबतच पाच मोबाइल फोन आणि Volkswagen कारचा समावेश आहे.
‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचे आमिष दाखवून फसवणूक
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या टोळीने अंधश्रद्धेचा आधार घेत नागरिकांना ‘पैशांचा पाऊस पाडू’ असे आमिष दाखवले. अशा प्रकारे समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी बनावट नोटांचा वापर केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
हे ही वाचा>> 22 वर्षीय तरुणासोबत अफेयर, 32 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला बागेत; काय घडलं?
चौकशीदरम्यान आरोपींनी या बनावट नोटा अहिल्यानगरमधील काही फरार आरोपींकडून मिळाल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सहा आरोपींची नावे समोर
या प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत सहा आरोपींची नावे समोर आली आहेत. त्यापैकी गणेश शेवाळे, सुमित चंदनशिवे आणि सुरज कांबळे यांना अटक करण्यात आली आहे.
तर प्रताप धुमाळ, अशोक दारकुंडे आणि अम्मू हे तीन आरोपी सध्या फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गतही गुन्हा
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट नोटांचा स्रोत, टोळीतील इतर सदस्य आणि यापूर्वी अशा प्रकारे किती लोकांची फसवणूक करण्यात आली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ADVERTISEMENT












