Beed Crime News : बीड जिल्ह्यातील परळी येथील शासकीय आयटीआय कॉलेज परिसरात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच परळी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून पुढील तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'आजी, लगेच जाऊन आलो...' चिमुरडा सायकलवरुन गेला, शेजारच्या घरात सापडली बॉडी
आयटीआय कॉलेज परिसरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवकाची ओळख परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील रहिवासी आकाश राम खाटिक अशी पटली आहे. आकाश खाटिक याच्याविरोधात यापूर्वी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, त्याचा मृतदेह आयटीआय कॉलेज परिसरात आढळून आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू ठेवला असून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा : प्रियकराशी बोलताना गोंधळ घालायचा, आईने निष्पाप मुलाला संपवलं, पतीने महिन्याने केला उलगडा
"तू मला का बोलत नाहीस?" अशी विचारणा करत केली होती विचारणा
मिळालेल्या माहितीनुसार, दादाहरी वडगाव येथील 17 वर्षे 11 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीसोबत आकाश खाटिक याचे प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात आले आहे. या संबंधांना मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता, अशी चर्चा गावात होती. याच दरम्यान, "तू मला का बोलत नाहीस?" अशी विचारणा करत आकाशने संबंधित मुलीवर विळ्याने गळ्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणानंतर मुलीच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकाश खाटिक याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो फरार असल्याचे सांगण्यात आले होते आणि पोलीस त्याचा शोध घेत होते.
दरम्यान, संबंधित प्रकरणात पोलीस त्याचा शोध घेत असतानाच आज त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परळी परिसरासह दादाहरी वडगाव गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला असून आकाशने हे टोकाचे पाऊल का उचलले, तसेच त्याच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या पोक्सो गुन्ह्याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT












