Crime News : भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारागृहातील 58 वर्षीय महिला रक्षकावर जेलरने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मग्नु सिंह मरावी असे आरोपी जेलरचे नाव आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने बलात्कार केल्यानंतर या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
रात्री गस्त घालत असताना...
पीडित महिला रात्रीच्या ड्युटीवर असताना कारागृह परिसरात गस्त घालत होती. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तिची आरोपी जेलरसोबत भेट झाली. यावेळी आरोपीने तिच्याशी अश्लील बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर जबरदस्तीने तिला कारागृहातील स्वच्छतागृहात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर महिलेने रात्री उशिरा गांधी नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
हे ही वाचा : डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यास शरद पवार इंडिया आघाडीत असतील का? राहुल गांधी उत्तर देताना म्हणाले...
महिला रक्षकाच्या सेवा नोंदीत 'त्या' तक्रारी
दरम्यान, या प्रकरणानंतर भोपाळ मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने महिला रक्षकाच्या सेवा नोंदी आणि यापूर्वी केलेल्या तक्रारींचा उल्लेख केला आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 2003 पासून तिच्या सर्व्हिस बुकमध्ये प्रतिकूल नोंदी आहेत. 2004 मध्ये तिने तत्कालीन जेल अधीक्षकांविरोधात आरोप केले होते. 2018 मध्ये तीन कर्मचाऱ्यांविरोधात छेडछाडीची तक्रार, तर 2021 मध्ये एका हेडगार्डविरोधात गैरवर्तनाची तक्रार केली होती. याशिवाय दुसऱ्या एका रक्षकानेही 2026 मध्ये तिच्याविरोधात शिवीगाळ आणि खोट्या आरोपांची धमकी दिल्याची तक्रार केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, या जुन्या तक्रारींवरून सध्याच्या आरोपांची सत्यता ठरत नाही. त्याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे.
हे ही वाचा : विधवा सून गावातील तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत, सासऱ्याने पाहिलं अन् एकच गोंधळ; अखेर काय घडलं?
पोलिसांनी काय सांगितलं?
या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी शशांक जैन यांनी दिली. महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, ड्युटी रेकॉर्ड आणि इतर पुरावे तपासले जाणार आहेत. पोलिसांनी पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी केली असून कथित घटनास्थळाचीही पाहणी केली आहे. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT












