Crime News : बिहारमधील बगहा येथील एका खाजगी शाळेच्या वसतिगृहात 10 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारच्या (10 जुलै) सकाळी या विद्यार्थ्याचा मृतदेह वसतिगृहातील त्याच्या खाटेवर आढळून आला. या घटनेमुळे शाळा परिसरात एकच गोंधळ उडाला असून, माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी पोहोचून संताप व्यक्त केला. नातेवाईकांनी शाळेच्या दोन शिक्षकांवर विद्यार्थ्याला बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपी शिक्षकांना अटक केली असून, पोलीस सध्या सर्व बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
बेदम मारहाण केल्याचा आरोप
प्रिन्स कुमार (वय 10 वर्ष) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो हरनाटांड येथील कौटिल्य पब्लिक स्कूलच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्यानंतर संपूर्ण शाळेत घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, गुरुवारी संध्याकाळी शाळेतील शिक्षक हेमराज कुमार आणि दीपक कुमार यांनी मुलांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत प्रिन्सला देखील अत्यंत निर्दयीपणे मारण्यात आले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. विद्यार्थ्याच्या शरीरावर, पाठीवर आणि डोळ्यांजवळ जखमांच्या खुणा आढळल्याचा दावा नातेवाईकांनी केला असून, याच आधारावर त्यांनी शिक्षकांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
हे ही वाचा : व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांवर काळाचा घाला, 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू
शाळेत तणावाचे वातावरण
या घटनेची माहिती पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि नातेवाईक शाळा परिसरात जमा झाले, ज्यामुळे तिथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लोकांची समजूत काढली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असून फॉरेन्सिक टीमने वैज्ञानिक पद्धतीने पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी बगहा अनुमंडलीय रुग्णालयात पाठवला आहे.
हे ही वाचा : मुंबई: टिव्ही अभिनेत्याला अटक, 16 वर्षीय मुलीचा छळ केल्याचा आरोप
दोन शिक्षकांना अटक
पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासणीनंतरच स्पष्ट होऊ शकेल. सध्या अटक करण्यात आलेल्या हेमराज कुमार आणि दीपक कुमार या दोन्ही शिक्षकांची चौकशी केली जात आहे. तपासामध्ये मारहाण किंवा हत्येची पुष्टी झाल्यास आरोपींवर त्यानुसार कडक कलमे लावली जातील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या धक्कादायक घटनेने खाजगी शाळांमधील वसतिगृहातील मुलांच्या सुरक्षिततेचा आणि व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला असून, संपूर्ण परिसरात सध्या शोक आणि संतापाचे वातावरण आहे.
ADVERTISEMENT












