Crime News : निसर्गाचा नियम आहे की संकट आलं की लेकरू बापाच्या कुशीत शिरतं, पण त्याच बापाचे हात जेव्हा काळासारखे धावून येतात, तेव्हा नियतीवरचा विश्वास उडतो. बिहारच्या भोजपूरमधील एका छोट्याशा गावात बुधवारी (18 मार्च) संध्याकाळी अशीच एक सुन्न करणारी घटना घडली. येथील एका मंदिराजवळ एका पित्याने आपल्या अवघ्या सहा महिन्यांच्या पोटच्या मुलीला जमिनीवर जोरात आदळले. या भीषण घटनेत आराध्या नावाच्या मुलीचा अंत झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : कोंबडी चोरण्यावरून वाद, पुतण्याने घरात घुसून काकीवर चाकूने केले वार, रक्ताच्या सड्यात मृतदेह
उपचारासाठी आणले अन् घात झाला
मिळालेल्या माहितीनुसार, आराध्याचे वडील दीपांकर कुमार यांची गेल्या महिन्याभरापासून मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यांना बरे वाटावे या आशेने त्यांची पत्नी सुनीता कुमारी त्यांना देव दर्शनासाठी घेऊन आली होती. बुधवारी संध्याकाळी सर्व काही सुरळीत सुरू असताना, चिमुरड्या आराध्याने खराब केलेले कपडे धुण्यासाठी सुनीता बाजूला गेली आणि विश्वासाने लेकीला पतीच्या कुशीत सोडून गेली. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याच क्षणी दीपांकरचा मानसिक तोल ढळला आणि त्याने रागाच्या भरात आपल्या काळजाच्या तुकड्याला उंचावरून थेट जमिनीवर आपटले.
दवाखान्याकडे धाव, पण वेळ निघून गेली होती
हा प्रकार पाहताच तिथे असलेल्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या आराध्याला घेऊन कुटुंबीयांनी तातडीने आरा येथील सदर रुग्णालयाकडे धाव घेतली. प्रत्येक सेकंद मृत्यूशी झुंज देत असलेल्या त्या माऊलीच्या डोळ्यासमोर फक्त आपल्या लेकीचा चेहरा होता. मात्र, डॉक्टरांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच आराध्याची प्राणज्योत मालवली होती. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. एका क्षणात हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि ज्या हातांनी लेकीला खेळवायचं, त्याच हातांनी तिचा घात केल्याचे क्रूर वास्तव समोर आले.
हे ही वाचा : डोरेमॉनचे दिग्गज दिग्दर्शक शिबायामा त्सुतोमु यांचे निधन; ॲनिमेशन विश्वावर शोककळा
मातेचा टाहो अन् सुन्न गाव
सुनीता आणि दीपांकर यांच्या लग्नाला तीन वर्षे झाली होती. अनेक नवस-सायासानंतर झालेली आराध्या ही त्यांची एकुलती एक मुलगी होती. आपल्या डोळ्यादेखत आपल्या सुखी संसाराचा आधार गेल्याने आई सुनीताचा टाहो आभाळ फाडणारा होता. 'माझ्या लेकीचा काय दोष होता?' हा तिचा प्रश्न तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणत होता. घटनेनंतर नातेवाईक मृतदेह घेऊन गावी परतले असून, संपूर्ण गावात स्मशानशांतता पसरली आहे. मानसिक आजारामुळे एका बापाने स्वतःच्या हाताने स्वतःच्या वंशाचा दिवा विझवल्याची ही घटना समाजाला विचार करायला लावणारी ठरली आहे.
ADVERTISEMENT











