Crime News : बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. बरारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरखीकल परिसरात एका तरुणाने तीन मजली इमारतीवरून उडी मारून जीव दिल्याची घटना घडली. मृत तरुणाची ओळख सूरज कुमार अशी झाली असून, तो गेल्या पाच वर्षांपासून आपल्या शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत राहत होता. सुमारे 30 फूट उंचीवरून खाली पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात संबंधित महिलेने ही आत्महत्या असल्याचा दावा केला आहे, तर मृताच्या भावाने ही नियोजित कटाची घटना असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : जैन समाजाकडून राज ठाकरेंना लेखी माफीनामा, शिवतीर्थवर काय घडलं?
सूरजने कशामुळे उचलले टोकाचे पाऊल?
माहितीनुसार, सूरज कुमार हा नेहा नावाच्या विवाहित महिलेसोबत सुरखीकल येथील एका फ्लॅटमध्ये राहत होता. महिलेचा पती दुसऱ्या राज्यात नोकरी करत असून ती आपल्या मुलांसोबत येथे राहत होती. नेहा हिने सांगितले की, सूरजला मद्यपानाचे व्यसन होते. तो आदल्या दिवशीही मद्यधुंद अवस्थेत आला होता आणि घराची चावी मागत होता. दुसऱ्या दिवशी सकाळीही त्याने मद्यपान केले होते. तो फ्लॅटमध्ये आला तेव्हा ती आणि तिची मुलगी आंघोळ करून कपडे बदलत होत्या. त्याचवेळी सूरज खिडकीजवळ गेला आणि अचानक खाली उडी मारली. त्यांच्यात कोणताही वाद झाला नव्हता. उलट तो यापुढे मद्यपान करणार नसल्याचे सांगत होता. नेहाने असा दावा केला की, त्याने अतिमद्यपान आणि तिने दिलेल्या सल्ल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले असावे. तसेच सूरजच्या कुटुंबीयांना तो तिच्यासोबत राहत असल्याची माहिती होती, असेही तिने म्हटले.
हेही वाचा : “धाराशिव लोकसभा मतदारसंघात 4.5 लाख मुस्लिम मतदार", अर्चना पाटील नेमकं काय म्हणाल्या?
महिलेपासून दूर राहण्याचा सल्ला, पण सूरजने ऐकलं नाही!
दुसरीकडे, मृत सूरज कुमारच्या भावाने या संपूर्ण घटनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, सूरज अविवाहित होता आणि संबंधित महिलेच्या प्रेमसंबंधात अडकला होता. तो मजुरी करून मिळणाऱ्या कमाईतील मोठा हिस्सा त्या महिलेला देत असे. कुटुंबीयांनी अनेक वेळा त्याला त्या महिलेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ती वारंवार फोन करून त्याला पुन्हा बोलावत असल्याचा आरोप त्याने केला. भावाने सांगितले की, घटनेच्या दिवशी सकाळी सूरज घरी आला होता. त्याने रात्रभर काही खाल्ले नसल्याचे सांगत 100 रुपये मागितले होते. त्यानंतर काही वेळातच इमारतीवरून उडी मारल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ही आत्महत्या नसून संबंधित महिलेमुळेच त्याचा जीव गेल्याची शंका मृताच्या भावाने व्यक्त केली आहे.
घटनेची माहिती मिळताच बरारी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल)च्या पथकालाही घटनास्थळी बोलावण्यात आले. पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. आता हा प्रकार अतिमद्यपान आणि महिलेने दिलेल्या सल्ल्यामुळे झालेली आत्महत्या आहे की त्यामागे आणखी काही कारण किंवा कट आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. तपासाचा अहवाल आणि गोळा करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.
ADVERTISEMENT











