Crime News : कौटुंबिक वादातून एका सहा महिन्यांच्या गरोदर महिलेची तिच्या पतीनेच निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने आधी महिलेला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर पाण्याच्या बादलीत तिचे तोंड बुडवून तिला जीवे मारले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. नेहा असे 26 वर्षीय मृत महिलेचे नाव असून तिच्या आरोपी पतीचे नाव अमित असे आहे. हरियाणातील फरिदाबादमध्ये ही घटना घडली.
ADVERTISEMENT
बादलीतील पाण्यात तोंड दाबून...
नेहा आणि अमित यांचा विवाह गेल्या वर्षी 30 एप्रिल रोजी झाला होता. त्यांनी नुकतेच फरिदाबादमधील कॉलनीतील एका नवीन घरात रहायला गेले होते आणि महिन्याभरापूर्वीच त्यांच्या नवीन घराचा गृहप्रवेश सोहळा पार पडला होता. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (25 जून) सकाळी या दांपत्यामध्ये काही कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. हा वाद इतका वाढला की, संतप्त अमितने आधी नेहाला मारहाण केली आणि नंतर अत्यंत क्रूरपणे बादलीतील पाण्यात तिचे तोंड दाबून तिचा जीव घेतला.
हे ही वाचा : अशोक चव्हाणांची 'ती' पोस्ट अन् नेटकरी तुटून पडले, कमेंट्समध्ये बेधडक सवाल
नातेवाईक घरी पोहोचले अन्...
या घटनेची माहिती मिळताच जेव्हा नातेवाईक त्यांच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांना नेहा मृत अवस्थेत आढळली. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलीस ठाण्याचे पथक, गुन्हे शाखा (क्राइम ब्रँच) आणि फॉरेन्सिक युनिटने तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात पाठवला. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून, प्राथमिक तपासानुसार हे हत्येचेच प्रकरण असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा : जैन समाजाकडून राज ठाकरेंना लेखी माफीनामा, शिवतीर्थवर काय घडलं?
काकांना फोन करुन दिली हत्येची माहिती
तपासादरम्यान पोलिसांना समजले की, हत्येनंतर अमितने बदरपूर सीमेजवळील अलिपूर गावात राहणाऱ्या आपल्या काकांना फोन केला होता आणि आपण पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली होती. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा मोबाईल फोनही बंद आहे. फरिदाबाद पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके संभाव्य ठिकाणांवर छापे टाकत आहेत आणि शवविच्छेदन अहवाल तसेच फॉरेन्सिक तपासणीनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT











