MP Crime News : मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनंतर या प्रकरणात नवे आणि हादरवून टाकणारे खुलासे समोर येत आहेत. ईसागढ रोडवरील फुटेरा चक परिसरात एका कारमध्ये तरुण आणि तरुणीचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळून आले. मृत तरुणीची ओळख 24 वर्षीय मुस्कान जैन, तर तरुणाची ओळख 25 वर्षीय रितिक सोनी अशी झाली आहे.
ADVERTISEMENT
मुस्कानच्या कुटुंबीयांना दोघांचे अनेक आक्षेपार्ह फोटो पाठवले
प्राथमिक तपासात रितिकने प्रथम मुस्कानची गळा चिरून आणि कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना घडवण्यापूर्वी रितिकने मुस्कानच्या कुटुंबीयांना दोघांचे अनेक आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. पोलिसांना कारमधून दोन पानांचे सुसाइड नोट तसेच विविध शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
हेही वाचा : केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल, शिंदेंच्या 'त्या' खासदाराला लॉटरी लागणार?
मुस्कानशी संपर्क होत नसल्याने पोलिसांत धाव
माहितीनुसार, मुस्कान बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडली होती. त्यानंतर रात्री 9.43 वाजता तिच्या चुलत भावाने मोबाईलवरील इंटरनेट सुरू केले असता त्याला व्हॉट्सअॅपवर 50 हून अधिक फोटो आणि तीन व्हिडिओ प्राप्त झाले. हे फोटो आणि व्हिडिओ रितिकने पाठवले होते. त्यामध्ये मुस्कान आणि रितिक एकत्र असल्याचे दिसत होते. हे पाहताच कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. मुस्कानशी संपर्क होत नसल्याने घाबरलेल्या नातेवाईकांनी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस ठाण्यात धाव घेत तिच्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी रितिकच्या मोबाईलचे लोकेशन शोधण्यास सुरुवात केली. शोधमोहीमेदरम्यान ईसागढ रोडवरील महाना गावाजवळ रस्त्यापासून सुमारे 20 फूट खाली एका खड्ड्यात आय-20 कार आढळून आली. कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला होता आणि हॉर्न सतत वाजत होता. पोलिसांनी कार उघडली असता चालकाच्या सीटवर रितिकचा मृतदेह होता, तर शेजारच्या सीटवर मुस्कानचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळला.
हेही वाचा : नवरा बाहेर असताना 'तो' महिलेसोबत फ्लॅटमध्ये.., शेवटी सूरजने तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी
पोलिसांनी कारची तपासणी केली असता अनेक धक्कादायक वस्तू सापडल्या. कारमधून अवैध पिस्तूल, कुऱ्हाड, पेपर कटर, सल्फासच्या गोळ्या, पेट्रोल, चॉकलेट्स आणि दोन पानांचे सुसाइड नोट जप्त करण्यात आले. कारच्या मागील सीटचा काही भाग जळालेला असल्याने कारला आग लावण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तपासात रितिक हे अवैध पिस्तूल सिवनी मालवा येथून घेऊन आल्याचे समोर आले आहे. पोलिसांना मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये रितिकने या नात्यात स्वतःला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा उल्लेख केला आहे. या प्रेमसंबंधामुळे तो प्रचंड तणावात होता आणि त्यातूनच त्याने ही भीषण घटना घडवल्याचे त्यात नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघेही इंदूरमध्ये एकत्र शिक्षण घेत होते आणि त्याच कंपनीत नोकरीही करत होते. मात्र, काही काळापासून त्यांच्यात गंभीर मतभेद सुरू असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, मुस्कानच्या डोक्यावर जड वस्तूने वार करण्यात आला होता. तिच्या मानेजवळ दोन खोल जखमा आढळल्या असून नाकातूनही रक्तस्राव झाल्याचे दिसून आले. महिला डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत लैंगिक अत्याचार अथवा बलात्कार झाल्याची कोणतीही पुष्टी झालेली नाही. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी विसेरा तपासणीसाठी जतन करण्यात आला आहे. तर रितिकच्या डोक्यात गोळी लागल्याच्या खुणा आढळल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सहा सदस्यीय विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या पथकात दोन पोलीस ठाण्यांचे प्रभारी, एक सब-इन्स्पेक्टर आणि सायबर तज्ज्ञांचा समावेश आहे. एफएसएल पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून सुसाइड नोट, कॉल डिटेल्स आणि फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ADVERTISEMENT











