Crime News : बिहारच्या कैमूर जिल्ह्यात एकापाठोपाठ एक मुंडकं नसलेले छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (12 मे) उशिरा रात्री रामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभैदे गावाजवळ एका गोणीमध्ये चार मृतदेहांचे तुकडे सापडले. धक्कादायक बाब म्हणजे, या मृतदेहांचे मुंडके गायब असल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. गेल्या दोन दिवसांतील ही दुसरी घटना असून, यापूर्वी 10 मे रोजी दुर्गावती नदीत दोन सुटकेसमध्ये अशाच प्रकारे तुकडे केलेले आणि मुंडकं गायब असलेले दोन मृतदेह सापडले होते. या क्रूर हत्याकांडाने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ADVERTISEMENT
ओळख पटवणे कठीण
घटनेची माहिती मिळताच कैमूरचे पोलीस अधीक्षक हरिमोहन शुक्ला आणि एसडीपीओ प्रदीप कुमार यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली असून एफएसएल (FSL) आणि डीआययू (DIU) च्या टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मृतदेहांची अवस्था इतकी भीषण आहे की, ते पुरुष आहेत की महिला, हे ओळखणेही पोलिसांसाठी कठीण झाले आहे. 10 मे रोजी दुर्गावती नदीत मिळालेले अवशेष आणि आता सापडलेले मृतदेह यांचा एकमेकांशी संबंध असण्याची शक्यता वर्तवत पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
हे ही वाचा : ड्रायव्हर अन् कंडक्टरने महिलेला ओढलं अन्.., स्लीपर बसमध्ये नेमकं काय घडलं?
सर्वच मृतदेहांची मुंडकी गायब
प्राथमिक तपासानुसार, गोणीत मिळालेल्या अवशेषांवरून तिथे चार मृतदेह असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामध्ये एक पुरुष आणि एका महिलेच्या मृतदेहाची पुष्टी झाली असून, तिसरा मृतदेह एका लहान मुलाचा किंवा मुलीचा असल्याचे समजते, ज्याची अधिकृत पडताळणी अद्याप बाकी आहे. चौथ्या मृतदेहाचीही ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृतांची ओळख पटू नये आणि पुरावे नष्ट व्हावेत या उद्देशाने मारेकऱ्यांनी मृतदेहांचे तुकडे करून त्यांचे मुंडके गायब केल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालानंतरच या प्रकरणातील अधिक तपशील समोर येतील.
हे ही वाचा : निर्दयी आई-बाप! चिमुकल्याच्या शिराचे लचके तोडत होते भटके कुत्रे, उरलेल्या धडाचा शोध सुरु
एकाच कुटुंबातील सदस्यांची सामूहिक हत्या?
या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि प्रसारमाध्यमांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जर कोणाकडेही बेपत्ता व्यक्तीबद्दल माहिती असेल किंवा कोणाची तक्रार दाखल असेल, तर तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. अद्याप एकाही मृतदेहाचे मुंडके सापडलेले नसून, पोलीस पथके सर्व संभाव्य मार्गांवर आणि ठिकाणांवर शोध घेत आहेत. एकाच कुटुंबातील सदस्यांची ही सामूहिक हत्या असावी का, या दिशेनेही पोलीस तपास करत असून या घटनेने संपूर्ण बिहार हादरून गेले आहे.
ADVERTISEMENT











