बॉयफ्रेंडच्या नादात खाल्ल्या घरचे वासे मोजले, करोडपतीच्या लेकीनं काय केलं?

Crime News : पितळ व्यापाऱ्याच्या घरात झालेल्या सव्वा कोटींच्या दरोड्याचा धक्कादायक उलगडा झाला असून, स्वतःच्या मुलीनेच प्रियकराच्या मदतीने हा कट रचल्याचे समोर आले आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

15 May 2026 (अपडेटेड: 15 May 2026, 04:01 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बॉयफ्रेंडच्या नादात खाल्ल्या घरचे वासे मोजले

point

करोडपतीच्या लेकीनं काय केलं?

Crime News :  मुरादाबादमधील अकबर कंपाऊंडमध्ये 11 मे रोजी पहाटेच्या सुमारास एका पितळ व्यापाऱ्याच्या घरात झालेल्या मोठ्या दरोड्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर जे वास्तव समोर आले, त्याने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. पितळ व्यापारी मोहम्मद इमरान यांची मुलगी अरीबा हिनेच आपला प्रेमी अरशद वारसी आणि त्याच्या तीन साथीदारांच्या मदतीने आपल्याच घरात हा दरोडा टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अरीबा आणि अरशद यांची जात वेगळी असल्याने त्यांच्या लग्नाला घरातून विरोध होण्याची शक्यता होती. त्यामुळे हा अडथळा दूर करण्यासाठी आणि नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या पैशांसाठी त्यांनी सव्वा कोटी रुपयांच्या लुटीचा हा भयानक कट रचला होता.

हे वाचलं का?

हेही वाचा : शाळकरी मुलाच्या रफ वहीने उलगडले हत्येचे गुपित, रील स्टारचे दोन प्रियकर अन् मोठं कांड

सात वर्षांचे प्रेम आणि करोडो रुपयांच्या लुटीचा कट

अरीबा आणि अमरोहा येथील अरशद वारसी यांच्यात गेल्या सात-आठ वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. प्रेमाच्या आड येणारी जातीची भिंत पाडण्यासाठी त्यांनी संपत्तीचा मार्ग निवडला. अरीबा हिला आपल्या घरात कोठे आणि किती पैसे ठेवलेले असतात याची इत्यंभूत माहिती होती. तिनेच अरशदला घरात मोठी रोख रक्कम असल्याची माहिती दिली. प्रेमात आंधळ्या झालेल्या अरीबाने अखेर संपत्तीच्या लालसेपोटी स्वतःच्या पित्याच्या घरावरच दरोडा टाकण्याचा निर्णय घेतला. हा दरोडा म्हणजे केवळ योगायोग नसून गेल्या महिन्याभरापासून रचला गेलेला एक सुनियोजित कट होता. या कटाची पहिली पायरी म्हणून अरीबाने एक महिना आधीच घराच्या मुख्य गेटची चावी चोरून अरशदच्या स्वाधीन केली होती.

हेही वाचा : बंद खोली आणि 31 दिवस, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; नेमकी घटना काय?

डिजिटल लॉक उघडून दरोडेखोरांना दिले प्रवेशद्वार

11 मे रोजी पहाटे चारच्या सुमारास जेव्हा मोहम्मद इमरान यांचे संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत होते, तेव्हा अरीबाने आतून डिजिटल लॉक उघडून दरोडेखोरांसाठी घराचे दरवाजे उघडले. अरशद आणि त्याचे साथीदार शस्त्रांसह घरात घुसले आणि त्यांनी संपूर्ण कुटुंबाला ओलीस ठेवले. त्यांनी घरातून सुमारे सव्वा कोटी रुपयांची रोख रक्कम लुटली. विशेष म्हणजे, कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून जाताना या टोळीने घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर (DVR) देखील उखडून नेला होता. आपल्याच मुलीने शत्रूसाठी घराची दारे उघडली असतील, याची पुसटशी कल्पनाही त्यावेळी कुणाला नव्हती. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावला.

अशी झाली आरोपींना अटक आणि मुद्देमाल जप्त

मुरादाबादचे एसएसपी सतपाल अंतिल यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथकांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची साखळी जोडली असता, संशयाची सुई घरातील व्यक्तीकडेच वळली. पोलिसांनी अरीबा, तिचा प्रेमी अरशद आणि त्यांच्या तीन साथीदारांना अटक केली. या काळ्या कृत्याचा पर्दाफाश केला. आरोपींकडून पोलिसांनी 47 लाख 24 हजार रुपये रोख, चार गावठी कट्टे, पाच मोबाईल आणि दोन कार जप्त केल्या आहेत. या प्रकरणातील उर्वरित रक्कम आणि फरार असलेल्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस सध्या विविध ठिकाणी छापे टाकत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात मुलीच्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.