'सावळी आहेस, डॉक्टर कशी बनणार?..', सततच्या छळामुळे नैराश्यात, विद्यार्थीनीची आत्महत्या, कुटुंबियांचे गंभीर आरोप

मुंबई तक

13 Jan 2026 (अपडेटेड: 13 Jan 2026, 09:10 AM)

Crime News : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यशस्विनी ही बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील अनेककल भागात असलेल्या एका खासगी डेंटल कॉलेजमध्ये ओरल मेडिसिन आणि रेडियोलॉजी विभागाची तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. शुक्रवारी ती आपल्या घरी मृत अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्राथमिक पंचनामा करण्यात आला.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'सावळी आहेस, डॉक्टर कशी बनणार?..', सततच्या छळामुळे नैराश्यात

point

विद्यार्थीनीची आत्महत्या, कुटुंबियांचे गंभीर आरोप

Crime News, बेंगळुरू : कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील अनेककल परिसरातील एका खासगी डेंटल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 23 वर्षीय यशस्विनी हिने आत्महत्या करत आयुष्य संपवल्याची माहिती पोलीस तपासात समोर आलीये. या घटनेनंतर कॉलेज परिसरात तसेच विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना असून, निष्पक्ष चौकशीची मागणी होत आहे.

हे वाचलं का?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यशस्विनी ही बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील अनेककल भागात असलेल्या एका खासगी डेंटल कॉलेजमध्ये ओरल मेडिसिन आणि रेडियोलॉजी विभागाची तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. शुक्रवारी ती आपल्या घरी मृत अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्राथमिक पंचनामा करण्यात आला.

यशस्विनीच्या मृत्यूची बातमी कॉलेज परिसरात पसरताच अनेक विद्यार्थी एकत्र जमले आणि कॉलेज व्यवस्थापनाला जाब विचारला. संस्थात्मक दबावामुळेच ही घटना घडली असावी, असा संशय काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार यशस्विनीच्या आईकडून कॉलेज प्रशासनाविरोधात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. या आधारावर पोलिसांनी ‘अकस्मात मृत्यू अहवाल’ (UDR) नोंदवला असून, मृत्यूमागची नेमकी कारणं शोधण्यासाठी तपास सुरू आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हेही वाचा : 'फडणवीस म्हणतात अण्णामलाई 'तसं' म्हणालेच नाही ..', राज ठाकरेंकडून लाव रे तो व्हिडिओ.. फडणवीसांवर पडले तुटून!

मात्र दुसरीकडे, कुटुंबीयांनी मानसिक छळाचे आरोप केल्याचंही समोर येत आहे. यशस्विनी ही परिमला आणि भुदेवय्या यांची एकुलती एक मुलगी होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कॉलेजमध्ये झालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे ती मानसिक तणावाखाली होती. यशस्विनीच्या आई परिमला यांनी सांगितले की, बुधवारी डोळ्यांमध्ये तीव्र वेदना असल्याने तिने कॉलेजमधून रजा घेतली होती. त्यानंतर ती पुढच्या दिवशी कॉलेजमध्ये गेली असता, सेमिनारमध्ये सहभागी न झाल्याच्या कारणावरून तिला इतर विद्यार्थ्यांसमोर अपमानित करण्यात आलं.

कुटुंबीयांचा आरोप आहे की एका लेक्चररने तिला सेमिनारमध्ये सहभागी होण्यापासून रोखलं आणि प्रेझेंटेशन न दिल्याबाबत सातत्याने तिला त्रास दिला. शिवाय तिच्या रंगावरुन तिला सावळी असल्याचे टोमणेही मारण्यात येत होते. याच घटनेनंतर ती प्रचंड मानसिक धक्क्यात गेली होती, असं कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

या घटनेनंतर अनेक विद्यार्थ्यांनी मृतदेह ठेवलेल्या शवागाराबाहेर आंदोलन केलं. ‘यशस्विनीला न्याय मिळावा’ आणि ‘प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी’ अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली. पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, कॉलेज प्रशासन, शिक्षक आणि कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जात असून, पोस्टमॉर्टेम अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. सध्या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, चौकशीतून जे सत्य समोर येईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'फडणवीस म्हणतात अण्णामलाई 'तसं' म्हणालेच नाही ..', राज ठाकरेंकडून लाव रे तो व्हिडिओ.. फडणवीसांवर पडले तुटून!