समाजात कुटुंबाची बदनामी होण्याची भीती, मुलीचा मर्डर करुन हिट अँड रनचा बनाव

मुंबई तक

09 Sep 2026 (अपडेटेड: 09 Sep 2026, 11:50 AM)

Crime News : अहमदाबादमध्ये 22 वर्षीय तरुणीची वडील आणि भावाने कथितरित्या हत्या करून मृत्यूला अपघाताचे स्वरूप दिल्याचा प्रकार उघडकीस आला. सीसीटीव्ही आणि तपासातील विसंगतींमुळे हत्येचा कट उघड झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

समाजात कुटुंबाची बदनामी होण्याची भीती

point

मुलीचा मर्डर करुन हिट अँड रनचा बनाव

Crime News : अहमदाबादमध्ये 22 वर्षीय सोफिया या तरुणीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडील मोहम्मद फारूक आणि भाऊ मोहम्मद हाबिल यांनी कथितरित्या हातोड्याने तिची हत्या करून हा प्रकार रस्ते अपघातासारखा भासवण्याचा प्रयत्न केला. सोफिया बापोल परिसरातील निकी हॉस्पिटलमध्ये काम करत होती. 12 ऑगस्टच्या रात्री ती भावासोबत मोटारसायकलवरून प्रवास करत असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा दावा करण्यात आला होता. या कथित अपघातात सोफिया आणि हाबिल दोघांनाही गंभीर दुखापत झाली होती. मात्र, सोफियाचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

हेही वाचा : फ्लाईंग किस, अश्लील हावभाव, दहीहंडीचा उत्सव या थराला का गेला? अविनाश जाधव EXCLUSIVE

हिट अँड रनचा बनाव रचून मुलीची हत्या 

या घटनेची सुरुवातीला वाहतूक पोलिसांनी हिट अँड रन अपघात म्हणून चौकशी सुरू केली. त्यानंतर एम डिव्हिजन पोलिसांनीही तपास केला. मात्र, हाबिलने सांगितलेल्या अपघाताच्या ठिकाणी प्रत्यक्षात अपघात झाल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांना आढळले नाहीत. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्येही त्या ठिकाणी अन्य कोणतेही वाहन दिसून आले नाही. हाबिलच्या जबानीत विसंगती आढळल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान या प्रकरणामागे हत्या असल्याचे समोर आले आणि हाबिलने वडील फारूक यांच्यासोबत मिळून सोफियाच्या हत्येचा कट रचल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

हेही वाचा : बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं, शुगर डॅडीलाही संपवण्याची धमकी

तरुणासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला अन् बदनामीची भीती 

पोलिसांच्या तपासानुसार, काही काळापूर्वी सोफियाचा एका तरुणासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे कुटुंबात बदनामीची भीती निर्माण झाली होती. वडील आणि भावाने सोफियाला समजावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ती दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंधात असल्याचा त्यांना संशय होता. पोलिसांनी सांगितले की, फारूक आणि हाबिल यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी सोफियाच्या हत्येचा कट रचला होता. 12 ऑगस्ट रोजी पावसाचा दिवस निवडण्यात आला. सोफिया कामावर जाण्या-येण्यासाठी वापरत असलेला तुलनेने कमी सीसीटीव्ही असलेला आणि अंधाराचा मार्ग त्यांनी निवडल्याचे तपासात समोर आले.

तपासानुसार, हाबिल आणि फारूक मोटारसायकलवरून सोफिया काम करत असलेल्या हॉस्पिटलकडे गेले. परतीच्या प्रवासात सोफियाला मोटारसायकलवर घेऊन जात असताना हाबिलने तिच्या डोक्यावर हातोड्याने वार केला. सोफिया बेशुद्ध झाल्यानंतर तिला मोटारसायकलवरून खाली टाकून तिच्या डोक्यावर पुन्हा दोन वार करण्यात आले. तिचा श्वास थांबेपर्यंत दोघेही तिथे थांबले. त्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह मोटारसायकलवर ठेवून काही अंतर प्रवास केला आणि रस्त्याच्या कडेला मृतदेह ठेवला. अपघाताचा बनाव करण्यासाठी हाबिलने स्वतःला जखमी केले आणि मोटारसायकलचेही नुकसान केले. सुमारे महिनाभरानंतर तपासातून हत्येचा कट उघडकीस आला. त्यानंतर एम डिव्हिजन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मोहम्मद फारूक आणि मोहम्मद हाबिल यांना अटक केली.