Crime News : कानपूरमधील औषध व्यापारी विनीत मिनोचा यांच्या हत्येने खळबळ उडालीये. 5 सप्टेंबरच्या रात्री विनीत मिनोचा हे घरात एकटे होते. त्यांचा मुलगा सुब्रत, सून शालू आणि सहा वर्षांचा नातू पार्टीसाठी रात्री साडेनऊच्या सुमारास घराबाहेर गेले होते. पहाटे सव्वा चारच्या आसपास ते घरी परतले. त्यावेळी शालू स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी गेली असता तिला एका खोलीतून रक्ताचा सडा पडलेला दिसला. तिने आरडाओरडा केल्यानंतर सुब्रतने खोलीचा दरवाजा उघडला. विनीत मिनोचा मृतावस्थेत होते. आसपासचे लोक घटनास्थळी जमा झाले आणि त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. तपासादरम्यान घरातून कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे किंवा जबरदस्तीने घरात प्रवेश केल्याचे पुरावे पोलिसांना आढळले नाहीत. त्यामुळे हत्या करणाऱ्याला घराची माहिती असावी, असा पोलिसांचा संशय होता.
ADVERTISEMENT
हेही वाचा : बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं, शुगर डॅडीलाही संपवण्याची धमकी
सूनेने रचललेला कट कसा उघडकीस आला?
पोलिसांनी घरातील आणि घराबाहेरील सीसीटीव्ही तपासले असता दोन संशयित व्यक्ती रात्रीच्या वेळी घरात शिरल्याचे दिसून आले. हे दोघे तब्बल 112 मिनिटे घरात होते. त्यानंतर पोलिसांनी इमारतीतील सुरक्षारक्षकांची चौकशी केली. त्यावेळी एक महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. सुब्रत, शालू आणि त्यांचा मुलगा पार्टीसाठी बाहेर जात असताना शालूने सुरक्षा रक्षकाला ‘विशाल येईल, त्याला घरी जाऊ द्या आणि त्याची एन्ट्री करण्याची गरज नाही’, असे सांगितल्याचे समोर आले. सीसीटीव्हीमधील संशयितांपैकी एकाची ओळख विशाल गौतम अशी पटली, तर दुसरा राजकिशोर होता. विशाल हा सुमारे 12 वर्षांपूर्वी मिनोचा यांच्या घरी काम करत होता. चोरीच्या आरोपावरून 2022 मध्ये त्याला कामावरून काढण्यात आले होते. पोलिसांनी दोघांचा शोध घेतला आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत या हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा झाला.
हेही वाचा ; फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी मराठ्यांचा बळी घेतला, आपण बदला नक्की घेऊ; जरांगेंचं थेट आव्हान
मास्टरमाइंड सून असल्याचे समोर
पोलिसांच्या तपासानुसार, विनीत मिनोचा यांच्या हत्येचा मास्टरमाइंड त्यांचीच सून शालू असल्याचे समोर आले. चौकशीत शालूने सांगितले की, 4 सप्टेंबरला तिने सामान देण्याच्या बहाण्याने विशालला घरी बोलावले होते. शनिवारी ती पती आणि मुलासोबत पार्टीला जाणार असल्याची माहिती तिने विशालला दिली होती. त्याच काळात विनीत यांची हत्या करण्याचा कट आखण्यात आला. विनीत झोपल्यानंतर त्यांच्या तोंडावर उशी ठेवून त्यांना मारण्याचा सुरुवातीचा प्लान होता. शालूने विशालला घराची डुप्लिकेट चावीही दिली होती. घटनेच्या रात्री 9 वाजून 38 मिनिटांच्या सुमारास शालूने विशालला घरात कोणी नसल्याचा संदेश दिला. त्यानंतर विशाल आणि राजकिशोर डुप्लिकेट चावीने घरात शिरले आणि एका बेडरूममध्ये लपून बसले. विनीत स्वयंपाकघरातून आपल्या खोलीकडे जात असताना त्यांना एका खोलीत विशाल दिसला. त्यांनी त्याला जाब विचारला. त्यानंतर विशाल आणि राजकिशोर यांनी त्यांच्यावर हल्ला केला. विशालने चाकूने विनीत यांच्या मानेवर वार केल्यानंतर त्यांच्यावर सपासप हल्ला केला. पोस्टमॉर्टेममध्ये विनीत यांच्यावर तब्बल 26 वार झाल्याचे समोर आले.
या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, सुरक्षा रक्षकाने दिलेली माहिती, विशालची कबुली आणि सीडीआर रिपोर्ट महत्त्वाचा ठरला. पोलिसांच्या तपासानुसार 1 जुलैपासून 5 सप्टेंबरपर्यंत शालू आणि विशाल यांच्यात सुमारे 30 ते 40 फोन कॉल झाले होते. हत्येच्या दिवशीही दोघांमध्ये सुमारे 14 फोन कॉल झाले. शालूने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पैशांसाठी सासऱ्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने ती त्रस्त होती. अधिकचे पैसे मागितल्यावर विनीत नकार देत असल्याचे तिने सांगितले. विनीत यांना बाजूला केल्यानंतर त्यांची संपत्ती आपल्या पतीला आणि पर्यायाने आपल्याला मिळेल, असा विचार करून तिने हत्येचा कट आखल्याचे तपासात समोर आले. विनीत राहत असलेल्या ऑर्बिट अपार्टमेंटमध्ये 1056 फ्लॅट आणि 27 बंगले होते. सुरक्षेसाठी 45 गार्ड आणि कॅमेऱ्यांची व्यवस्था असूनही घरातूनच नियोजनबद्ध पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर शालू धक्क्यात असल्याचे दाखवत रडत होती; मात्र तपासात तिचीच या हत्याकांडामागील भूमिका उघड झाली.
ADVERTISEMENT












