बॉयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

मुंबई तक

18 Aug 2026 (अपडेटेड: 18 Aug 2026, 11:47 AM)

Crime News : तीन-चार वर्षांच्या जुन्या प्रेमसंबंधाला कुटुंबांचीही संमती होती. मात्र, एका संशयातून झालेल्या वादानंतर परमप्रीत सिंहचा कारखाली आल्याने मृत्यू झाला.

Crime NewsCrime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बॉयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला

point

अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Crime News : रायपूरमध्ये जुन्या प्रेमसंबंधातून झालेल्या वादानंतर एका तरुणाचा मृत्यू झाला. प्रेयसीला थांबवण्यासाठी कारच्या बोनटवर चढलेल्या तरुणाला कारने सुमारे 200 मीटरपर्यंत फरफटत नेले आणि त्यानंतर तो रस्त्यावर पडला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कार त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रायपूरमधील आमानाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. 

हे वाचलं का?

हेही वाचा : Maharashtra Weather : पावसाचा वेग मंदावला, मान्सून गायब होण्याची शक्यता?

मृत तरुणाचे नाव परमप्रीत सिंह असून तो टाटीबंध येथील उदया सोसायटीत राहत होता. तो व्यावसायिक होता. परमप्रीत आणि संबंधित तरुणी एकमेकांना गेल्या तीन ते चार वर्षांपासून ओळखत होते. दोन्ही कुटुंबांमध्ये त्यांच्या लग्नाबाबतही चर्चा झाली होती. मात्र, एका भेटीतून निर्माण झालेला संशय आणि त्यानंतर झालेल्या वादामुळे परिस्थिती गंभीर बनली.

परमप्रीतने आपल्या प्रेयसीला तिचा मित्र भरत मंगनानी याच्यासोबत पाहिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. सुरुवातीला परमप्रीत आणि तरुणीमध्ये त्याच्या कारमध्येच वादावादी झाली. त्यानंतर तरुणी भरतसोबत जाण्यास निघाली. परमप्रीतने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. वाद वाढल्यानंतर परमप्रीतने भरतच्या कारला धडक दिली. त्यानंतर भरतने कार पुढे नेली. मात्र, परमप्रीत मागे हटला नाही आणि कारच्या बोनटवर चढला. कार थांबेल, अशी त्याची अपेक्षा असावी; मात्र कार थांबली नाही.

हेही वाचा : फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याने महाराष्ट्रात चर्चांना उधाण; CM पदाबाबत अखेर स्वतःच सांगितलं!

पोलिसांच्या माहितीनुसार, कार सुमारे 200 मीटरपर्यंत पुढे जात राहिली आणि परमप्रीत बोनटवरच होता. त्यानंतर तो अचानक रस्त्यावर पडला. पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यानंतर कार त्याच्या अंगावरून गेली. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. आमानाका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर घटनास्थळाच्या आसपास असलेल्या CCTV कॅमेऱ्यांची फुटेज तपासण्यात आली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, CCTV फुटेज आणि प्राथमिक तपासातून समोर आलेल्या घटनाक्रमाच्या आधारे प्रथमदर्शनी हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. या वादाची सुरुवात नेमकी कोणत्या कारणावरून झाली, कारला धडक कशी बसली, परमप्रीत कारच्या बोनटवर कसा चढला आणि रस्त्यावर पडल्यानंतर नेमके काय घडले, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या भरत फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. CCTV फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि आरोपीच्या अटकेनंतर या घटनेमागील नेमके सत्य स्पष्ट होईल. पोलिसांचा तपास सुरू आहे.