Crime News : मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील सारंगपूर येथे घडलेल्या एका अत्यंत भयावह आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. बागकुआ टंकी परिसरात राहणाऱ्या 55 वर्षीय मधुबाला राठौर आणि त्यांची 30 वर्षीय मुलगी शीतल राठौर या मायलेकींनी एकाच वेळी जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरले आहे. बुधवारी रात्री घराचे दार आतून बंद असल्याने आणि आतून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला, तेव्हा त्यांना या दुर्दैवी घटनेची माहिती मिळाली. तिथे शीतलचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये तरंगताना दिसला, तर आई मधुबाला हिने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली होती.
ADVERTISEMENT
हेही वाचा : शिर्डी : 'गद्दाराला साईबाबा किडे पाडून मारतील..' वाकचौरेंच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक पेटले
वैवाहिक कलहामुळे शीतल नैराश्यात
मिळालेल्या माहितीनुसार, शीतल राठौर हिचे लग्न चार वर्षांपूर्वी देवास जिल्ह्यातील नरवर झाला येथील कपिल राठौर याच्याशी झाले होते. मात्र, गेल्या एका वर्षापासून पती आणि सासरच्या मंडळींशी असलेले वाद विकोपाला गेल्यामुळे ती गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या माहेरी राहत होती. वैवाहिक कलहामुळे शीतल मानसिक तणावाखाली होती आणि याच नैराश्यातून तिने सेप्टिक टँकमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आपल्या लाडक्या मुलीचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये पाहिल्यानंतर, आई मधुबाला यांना हा आघात सहन झाला नाही आणि त्यांनीही काही वेळातच फाशी घेऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
हेही वाचा : Breaking News: 'ऑपरेशन टायगर'बाबत आताच्या घडीची सगळ्यात मोठी अपडेट, नेमकं काय अडलं?
शितलच्या आईचीही आत्महत्या
ही घटना उघडकीस आली तेव्हा तिथे जे दृश्य पाहायला मिळाले, त्याने उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. शीतलचा 10 महिन्यांचा चिमुकला मुलगा आपल्या मृत आजीच्या पायाजवळ बसून सतत रडत होता. घरी परतलेल्या शीतलच्या भावाला, धीरज राठौरला, जेव्हा दरवाजा बंद असल्याचे दिसले आणि त्याने तो तोडला, तेव्हा समोरची दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. घराच्या आत एकीकडे आई फासावर लटकत होती, तर दुसरीकडे चिमुरडा मुलगा आपल्या आईच्या आणि नानीच्या मृत्यूची जाणीव नसताना हतबल होऊन रडत होता. या दृश्याने शेजाऱ्यांचेही डोळे पाणावले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) अरविंद सिंह आणि उपनिरीक्षक राहुल सेंधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, मृत शीतलच्या सासरच्या मंडळींचीही लवकरच उलटतपासणी केली जाणार आहे. आत्महत्या करण्यामागची नेमकी कारणे आणि त्यात सासरच्या मंडळींचा काही सहभाग आहे का, याचा उलगडा पोलीस तपासात लवकरच होईल. या दुर्देवी घटनेने केवळ एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला नसून, एका निष्पाप बाळाचे भविष्यही अंधकारमय झाले आहे.
ADVERTISEMENT











