Crime News : झाशीतील सुरेंद्र अहिरवार यांच्या आयुष्यात सध्या विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. साधारणपणे घरात लाखो रुपये आले की आनंदाचे क्षण येतात; परंतु सुरेंद्र यांच्या बाबतीत उलट झालं आहे. कारण त्यांच्याकडे आलेल्या जमिनीच्या 20 लाख रुपयांच्या ऐवजावर आता त्यांची पत्नी पुष्पा परत येऊन हक्क मागत आहे. वर्ष 2020 मध्ये कथित प्रियकरासमवेत पळून गेलेली पुष्पा अचानक घरात दाखल झाल्याने या प्रकरणात नव्या वादाला तोंड फुटलंय.
ADVERTISEMENT
पाच वर्षांपूर्वी प्रियकरासाठी घर सोडले होते
सुरेंद्र यांचे विवाह मध्य प्रदेशातील पुष्पाशी दहा वर्षांपूर्वी झाले होते. दाम्पत्याला एक मुलगाही आहे. सुरुवातीला संसार सुरळीत चालला, परंतु काही काळानंतर पत्नीच्या वर्तणुकीत बदल दिसू लागला. घरी भांडणे, स्वतःला इजा करण्याचे प्रयत्न, सतत धमक्या अशा घटनांमुळे घरात तणाव वाढला. सुरेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये पुष्पा आपल्या बहिणीचा दीर आकाश याच्या संपर्कात आली आणि अचानक मुलाला घेऊन त्या पुरुषासोबत राहायला गेली.
हेही वाचा : आई बाथरूममध्ये गेली, बाहेर येईपर्यंत भावानेच 'त्या' कारणावरून बहिणीचा गळा चिरला
सुरेंद्रने दोन वर्ष पळून गेलेल्या पत्नीची वाट पाहिली
पत्नीच्या परतण्याची आशा ठेवून सुरेंद्रने जवळपास दोन वर्ष वाट पाहिली. गावात पंचायतीही झाल्या पण पुष्पा घरी परतली नाही. शेवटी त्यांना कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल करावी लागली. याचदरम्यान अलीकडे सुरेंद्र यांच्या खात्यात जमिनीचे 20 लाख रुपये जमा झाले. आणि याच पैशामुळे प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली. पुष्पा अचानक घरात आली आणि “मुलाच्या हक्काचे आठ लाख आणि उर्वरित भरपाई म्हणून माझा हिस्सा” अशी मागणी केली. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये मोठा वाद होऊन प्रकरण रक्सा पोलिस ठाण्यात पोहोचले.
पोलिसांची मध्यस्थी निष्फळ
रविवार आणि सोमवार अशा दोन्ही दिवशी रक्सा पोलिसांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. पंचायत बसवूनही निकाल लागला नाही. पत्नी हिस्सा न दिल्यास एफआयआरची धमकी देत आहे, तर सुरेंद्र आणि त्यांचे नातेवाईक कोणताही हिस्सा देण्यास तयार नाहीत.
‘घटस्फोटाचा खटला सुरू असताना कशाचा हिस्सा?’
सुरेंद्र म्हणतात, “लग्नानंतर सतत वाद, धमक्या आणि आत्महत्येच्या धमक्या देत होती. पाच वर्षांनी तर ती घर सोडून दुसऱ्यासोबत राहायला गेली. आता माझे पैसे आले म्हणून हिस्सा मागत आहे. आमचा घटस्फोटाचा खटला कोर्टात सुरू असताना तिला कोणत्या आधारावर पैसे द्यायचे?”
रक्सा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी स्पष्ट केले की, दाम्पत्याचा वाद आधीच न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाशिवाय पोलिसांकडून कोणताही निर्णय घेता येणार नाही. या संपूर्ण प्रकरणामुळे सुरेंद्र चिंतेत आहेत. पत्नी परत आली असली तरी तिचा उद्देश फक्त पैशांवर असावा, असा दावा त्यांचा आहे. आता पुढील निर्णय कोर्टच देणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











