मुंबईची खबर: दादर-CSMT स्टेशनवरील गर्दी कमी होणार! मुंबईतील स्थानकांवर उभारणार 20 नवे प्लॅटफॉर्म्स... प्रशासनाचा मोठा निर्णय
मुंबईतील रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुढील पाच वर्षांत एमएमआर (MMR)च्या चार मुख्य टर्मिनसवरील प्लॅटफॉर्मचा विस्तार केला जाणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दादर-CSMT स्टेशनवरील गर्दी कमी होणार!
मुंबईतील स्थानकांवर उभारणार 20 नवे प्लॅटफॉर्म्स...
रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
Mumbai News: येणाऱ्या काळात मुंबईतील रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुढील पाच वर्षांत एमएमआर (MMR)च्या चार मुख्य टर्मिनसवरील प्लॅटफॉर्मचा विस्तार केला जाणार आहे, यामुळे मुंबईहून देशाच्या विविध भागात जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येत वाढ होईल. मुंबईतील निश्चित स्थानकांवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म्स बांधले जाणार आहे.
लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या संख्येत वाढ
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या 4 टर्मिनसवर 20 नवे प्लॅटफॉर्म्स बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. यामध्ये परळ येथे पाच, कल्याण येथे सहा, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) वर चार आणि पनवेल येथे पाच प्लॅटफॉर्म्सचा समावेश असणार आहे. यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या संख्येत वाढ होण्याचा मार्ग सुद्धा मोकळा होणार आहे.
हे ही वाचा: Govt Job: पदवीधरांसाठी 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! कधी आणि कसा कराल अर्ज?
सीएसएमटी आणि दादर स्थानकांवरील गर्दी कमी होणार...
2025 च्या रेल्वे अर्थसंकल्पात परळला टर्मिनस म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव होता. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, परळ टर्मिनस हे कुर्ला आणि परळ दरम्यानच्या नवीन 5 व्या आणि 6 व्या मार्गाशी लिंक होणार आहे, याचा वापर केवळ मेल/ एक्सप्रेस गाड्यांसाठी केला जाईल. मुंबईतील या मध्यवर्ती टर्मिनसमुळे सीएसएमटी आणि दादर सारख्या स्थानकांवरील गर्दीचा तणाव काही प्रमाणात कमी होईल. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत सध्याच्या परळ स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आलं आहे. प्लॅटफॉर्मचा विस्तार झाल्याने स्थानकांवरून निघणाऱ्या आणि तिथे थांबणाऱ्या गाड्यांची सेवा देखील वाढेल.
हे ही वाचा: ठाणे: "लग्न करण्यासाठी आधी 21 वर्षांचा हो..." कुटुंबियांचं बोलणं मनाला लागलं अन् 19 वर्षीय तरुणाने संपवलं आयुष्य!
लोकमान्य टिळक टर्मिनसवर 4 नवीन प्लॅटफॉर्म बांधण्याची योजना आहे. हे स्टेशन लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी मुख्य टर्मिनल आहे आणि नव्या प्लॅटफॉर्म सुविधेमुळे इंटरसिटी तसेच एक्सप्रेस गाड्यांची संख्या वाढून प्रवाशांची गर्दी सुद्धा कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अशा पद्धतीने, वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल स्थानकावर 5 नवे प्लॅटफॉर्म बनवण्यात येणार आहेत. मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक, नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो नेटवर्कमुळे पनवेलला भविष्यात एक मुख्य ट्रान्सपोर्ट इंटरचेंज बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही वर्षांत पूर्ण होणाऱ्या या प्लॅटफॉर्ममुळे मध्य रेल्वेच्या सेवांमध्ये लक्षणीय वाढ होईल. सध्या, मध्य रेल्वेच्या 1,810 उपनगरीय सेवांवर दररोज अंदाजे 40 लाख प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे.










