आई-बाप, भाऊ अन् आजी...मुलाने कुऱ्हाडीने वार करुन सर्वांना संपवलं, नेमकं काय घडलं?

Crime News : मुलाने आपल्याच रक्ताच्या नात्यावर कुऱ्हाडीने घाला घातला. 1 आणि 2 मार्चच्या मध्यरात्री घडलेल्या या भीषण हत्याकांडात आरोपीने आई-वडील, बहीण आणि आजीची निर्घृण हत्या केली, तर मोठ्या भावाला गंभीर जखमी केले आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 07:11 AM • 08 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

आई-बाप, भाऊ अन् आजी...मुलाने कुऱ्हाडीने वार करुन सर्वांना संपवलं

point

नेमकं काय घडलं?

Crime News : माणसाची पैशांची हाव किती टोकाला जाऊ शकते, याचा प्रत्यय आणणारा थरकाप उडवणारा प्रकार उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात समोर आला आहे. जमिनीची विक्री आणि दागिन्यांच्या पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादातून एका मुलाने आपल्याच रक्ताच्या नात्यावर कुऱ्हाडीने घाला घातला. 1 आणि 2 मार्चच्या मध्यरात्री घडलेल्या या भीषण हत्याकांडात आरोपीने आई-वडील, बहीण आणि आजीची निर्घृण हत्या केली, तर मोठ्या भावाला गंभीर जखमी केले आहे.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील रूपईडीहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसंतपुर ऊदल गावात ही घटना घडली. निरंकार नावाच्या तरुणाचे आपल्या कुटुंबीयांशी गेल्या काही दिवसांपासून पैशांवरून वाद सुरू होते. नुकतीच त्यांच्या कुटुंबाने जमीन आणि काही दागिने विकले होते. या विक्रीतून मिळालेल्या रकमेतील हिस्सा निरंकार मागत होता, मात्र वडील बदलू राम यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. हाच राग मनात धरून रविवारी मध्यरात्री जेव्हा सर्व कुटुंबीय गाढ झोपेत होते, तेव्हा निरंकारने घरात असलेली कुऱ्हाड उचलली आणि एकामागून एक सर्वांवर वार करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद राखण्यासाठी काँग्रेसची उद्धव ठाकरेंना 'फोनाफोनी', नवी ऑफरही देऊन टाकली

मृतांची नावे

या हल्ल्यात आरोपीने खालील सदस्यांची हत्या केली:

1. बडलू राम (वडील)
2. संजू देवी (आई)
3. पार्वती (बहीण)
4. सिताला (आजी)

भावावरही जीवघेणा हल्ला

कुटुंबीयांचा आक्रोश आणि ओरडण्याचा आवाज ऐकून मोठा भाऊ गुरुदेव हा त्यांना वाचवण्यासाठी धावला. मात्र, संतापलेल्या निरंकारने गुरुदेवच्या डोक्यातही कुऱ्हाडीने गंभीर वार केले. गुरुदेवचा मुलगा आझाद याने हा सर्व प्रकार पाहिला आणि आरडाओरडा सुरू केला. आझादच्या आवाजामुळे गावकरी घटनास्थळी धावून आले, तोपर्यंत निरंकारने स्वत:लाही विटेने मारून जखमी करून घेतले होते.

पोलीस तपास आणि कारवाई

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक, स्थानिक पोलीस ताफा आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहून संपूर्ण गाव सुन्न झाले होते. पोलिसांनी तातडीने चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. गंभीर जखमी झालेल्या गुरुदेववर चरदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. तर स्वतःला जखमी करून घेतलेल्या आरोपी निरंकारची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला लखनौ येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

आरोपी निरंकार याच्याविरुद्ध हत्या आणि खुनाचा प्रयत्न अशा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात जमिनीचा वाद हेच हत्येचे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून गावात सध्या शांतता आहे.

पैशांच्या हवसेपोटी होत्याचे नव्हते झाले

एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा एका रात्रीत अंत झाला आहे. जमिनीच्या तुकड्यासाठी आणि काही पैशांसाठी पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्यांची हत्या केल्याने परिसरात संतापाची लाट आहे. या घटनेने पुन्हा एकदा रक्ताच्या नात्यातील वाढती दरी आणि मानवी क्रूरतेचे दर्शन घडवले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बॉयफ्रेंडने निर्जनस्थळी नेऊन अत्याचार करुन गेला, पीडितेच्या मदतीसाठी आलेल्या तरुणानेही अब्रू लुटली, शेवटी केला मर्डर
 

    follow whatsapp