Crime News : ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील चारंपाजवळ घडलेल्या एका भयानक घटनेने खळबळ उडाली आहे. मुसळधार पाऊस सुरु असताना एक महिला निर्जन ठिकाणी शेडखाली उभी होती. रस्त्याने जात असलेल्या एका ट्रकचालकाच्या नजरेस ती महिला पडली. त्याने ट्रक मागे घेतला, थांबवला आणि खाली उतरून त्या महिलेला जबरदस्तीने ट्रकमध्ये उचलून नेले. सदर महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. ट्रकचालकाने तिचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होताच परिसरात खळबळ माजली. पोलिसांनी तत्काळ आरोपी ट्रकचालकाचा शोध घेत त्याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
आरोपी ट्रक ड्रायव्हरला पोलिसांकडून अटक
भद्रक पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी ट्रकचालकाचे नाव मोहम्मद सद्दाम हुसैन असून तो क्योंझर जिल्ह्यातील झुमपूरा येथून अटक करण्यात आला आहे. त्याच्यासह ट्रकही जप्त करण्यात आला आहे. भद्रकचे पोलीस अधीक्षक मनोज राऊत यांच्या आदेशानुसार दोन पथके तयार करण्यात आली होती. या दोन्ही पथकांनी संयुक्त कारवाई करून आरोपीचा ठावठिकाणा लावला.
पोलिसांनी सांगितले की ही घटना रात्री घडली होती. महिला पावसापासून बचाव करण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानाच्या ओट्यावर उभी होती. त्याच वेळी आरोपी ट्रकचालकाने ट्रक थांबवून जबरदस्तीने तिला उचलून नेले आणि ट्रक घेऊन फरार झाला. पीडित महिला मदतीसाठी ओरडत होती, पण आसपास कोणीच नव्हते.
नेटकऱ्यांकडून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये तीव्र संताप पसरला. नेटकऱ्यांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी सुरू केली. पोलिसांकडे तक्रार पोहोचताच तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान ट्रक झुमपूरा येथे सापडला आणि आरोपीला पकडण्यात आले. प्राथमिक चौकशीत उघड झाले की आरोपीने महिलेला अत्याचार केल्यानंतर निर्जन ठिकाणी सोडून दिले. पोलिसांनी पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणाबाबत भद्रकचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP) अरूप अभिषेक बेहरा यांनी सांगितले की, तक्रार मिळताच तातडीने दोन पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ट्रकचा शोध घेण्यात आला. हा ट्रक धामरा पोर्टवरून कोळसा घेऊन जात होता. आरोपीला अटक करून ट्रक जप्त केला आहे. तपासात आणि सीसीटीव्ही फुटेज पाहता हे स्पष्ट होते की ट्रकचालकाने महिलेला लैंगिक अत्याचाराच्या उद्देशाने पळवून नेले होते. आरोपीविरुद्ध कठोर कारवाई सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
