व्यावसायिकाची पत्नी गोगी गँगला मिळाली, पतीच्या हत्येचा कट अन् मागितली 50 लाखांची खंडणी

delhi crime news : गोगी गँगच्या नावाने 50 लाखांची खंडणी उकळण्याच्या कटाचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात व्यावसायिकाची पत्नी आणि गँगशी संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार दिल्लीतून समोर आलाय.

delhi crime news

delhi crime news

मुंबई तक

30 Jun 2026 (अपडेटेड: 30 Jun 2026, 09:11 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

व्यावसायिकाची पत्नी गोगी गँगला मिळाली

point

पतीच्या हत्येचा कट अन् मागितली 50 लाखांची खंडणी

delhi crime news : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने गोगी गँगच्या नावाने एका व्यावसायिकाकडून 50 लाख रुपयांची खंडणी उकळण्याच्या धक्कादायक कटाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी व्यावसायिकाची पत्नी सपना जैन आणि गोगी गँगशी संबंधित रजत या आरोपीला अटक केली आहे.

हे वाचलं का?

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या दोघांनी संगनमत करून व्यावसायिकाला आणि त्याच्या कुटुंबाला धमकावून मोठी रक्कम उकळण्याचा कट रचला होता. एवढेच नव्हे, तर व्यावसायिकाच्या आईची हत्या घडवून आणणे आणि स्वतः व्यावसायिकावर हल्ला करण्याचाही कट आखण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनमधून अनेक महत्त्वाच्या चॅट्स आणि डिजिटल पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत.

हेही वाचा : लोहगड हत्या केस: चेतनसाठी 'तो' होता इशारा.. सिया खाली वाकली अन् केतनचा खेळ खल्लास!

50 लाख रुपयांची खंडणी मागितली, आईसह कुटुंबियांची हत्या करण्याची धमकी 

पोलिसांच्या माहितीनुसार, 14 जून 2026 रोजी संबंधित व्यावसायिकाच्या मोबाईलवर अमेरिकेतील एका क्रमांकावरून कॉल आणि संदेश आले होते. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला गोगी गँगचा सदस्य असल्याचे सांगत 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास व्यावसायिकासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली जाईल, अशी धमकीही देण्यात आली होती. तसेच व्यावसायिकाच्या घराचे, दुकानाचे फोटो आणि लोकेशनही पाठवण्यात आल्याने कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर व्यावसायिकाने लक्ष्मी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडे सोपवण्यात आला. तांत्रिक देखरेख, कॉल रेकॉर्ड आणि अन्य डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आणि सुरुवातीपासूनच या कटात स्थानिक व्यक्तींचाही सहभाग असण्याची शक्यता पोलिसांना वाटत होती.

व्यावसायिकावर हल्ला करण्याचाही कट रचण्यात आला 

तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिस हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी रजतपर्यंत पोहोचले आणि 25 जून रोजी त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. तो एकीकडे अमेरिकेत बसलेल्या आरोपीच्या संपर्कात होता, तर दुसरीकडे व्यावसायिकाची पत्नी सपना जैन आणि तिच्या बहिणीसोबत सातत्याने संवाद साधत असल्याचे समोर आले. पोलिस चौकशीत रजतनवर सपना जैनने आपल्या पतीकडून खंडणी वसूल करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती, असा खुलासा केला. तसेच व्यावसायिकाच्या आईची हत्या घडवून आणणे आणि व्यावसायिकावर हल्ला करण्याचाही कट रचण्यात आल्याचे त्याने सांगितले. तपासात सपना जैन आपल्या पतीच्या हालचाली, दिनक्रम आणि येण्या-जाण्याची माहिती सातत्याने रजतला पुरवत असल्याचेही समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सपना जैनलाही अटक केली.

स्पेशल सेलने आरोपींकडून जप्त केलेल्या मोबाईल फोनमध्ये अनेक आक्षेपार्ह चॅट्स आणि संभाषणांचे रेकॉर्ड मिळाले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या चॅट्समधून सपना जैन आणि गोगी गँगशी संबंधित व्यक्तींमधील सातत्यपूर्ण संपर्काचे पुरावे समोर आले आहेत. या डिजिटल पुराव्यांचे सखोल विश्लेषण करून या कटात आणखी कोणाचा सहभाग होता, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. तपासात असेही समोर आले आहे की, पीडित व्यावसायिक आणि सपना जैन यांचा विवाह 2007 मध्ये झाला होता आणि त्यांना दोन मुले आहेत. पती-पत्नीमध्ये अनेक वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होता.

व्यावसायिकाची आई नेहमी मुलाची बाजू घेत असल्यामुळे सपना जैन नाराज होती. त्यातूनच तिने आपल्या बहिणीचा मित्र रजत याच्यासोबत मिळून हा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात रजतचे गोगी गँगमधील अनेक सदस्यांशी संबंध असल्याचेही समोर आले असून, त्याचा तुरुंगात असलेल्या रोहित मोई आणि अमेरिकेत बसलेल्या कर्मवीर पहलवान उर्फ मीता यांच्याशीही संपर्क असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. रजतविरुद्ध यापूर्वी चोरी आणि आर्म्स अॅक्टअंतर्गत अनेक गुन्हे दाखल असून, या संपूर्ण नेटवर्कचा, परदेशी कनेक्शनचा आणि इतर संबंधित आरोपींचा शोध दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे.