Crime News : गुजरातमधील मांडवी तालुक्यातील गोदावडी या अवघ्या चार हजार लोकवस्तीच्या गावात 22 वर्षीय संगणक अभियंता निधी पटेल हिची अत्यंत रहस्यमयरीत्या हत्या करण्यात आली आहे. 23 ऑगस्टच्या रात्री निधीचे कुटुंबीय डाकोर येथे तीर्थयात्रेहून मध्यरात्री तीन वाजता घरी परतले, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पुढचा दरवाजा बंद असल्याने निधीचे वडील वासुदेव पटेल यांनी मागच्या उघड्या दरवाजाने घरात प्रवेश केला, तेव्हा घरात सामानाची नासधूस झाल्याचे आणि अडीच लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शोधाशोध केल्यानंतर घराच्या गच्चीवर एका अडगळीच्या ठिकाणी निधीचा मृतदेह अत्यंत विदारक अवस्थेत आढळून आला; तिचा चेहरा प्लास्टिकच्या पिशव्यांनी झाकलेला होता, हातपाय बांधलेले होते आणि मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
घटनास्थळी 900 फिंगरप्रिंट्स
या हत्याकांडाने पोलीस आणि फॉरेन्सिक टीमलाही चक्रावून सोडले आहे, कारण तपासादरम्यान घटनास्थळी तब्बल 900 हातांचे ठसे (फिंगरप्रिंट्स) सापडले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, घरात कोणीही जबरदस्तीने घुसल्याचे (फोर्स एंट्री) पुरावे नाहीत. निधीला तळमजल्यावर मारून तिचा मृतदेह मुख्य दरवाजाला लागून असलेल्या शिडीवरून गच्चीवर नेण्यात आला, तरीही दाट वस्ती असूनही शेजाऱ्यांपैकी कोणालाही याचा सुगावा लागला नाही. एवढ्या मोठ्या संख्येने फिंगरप्रिंट्स मिळूनही घरात किंवा बाहेर कोणाच्याही पायाचे ठसे न आढळल्याने हे 900 ठसे एका रात्रीत तिथे आलेच कसे, हे पोलिसांसमोरचे सर्वात मोठे कोडे बनले आहे.
हे ही वाचा : भाजपात निघालेल्या राहुल बोंद्रे यांना राहुल गांधी यांनी फोन करून कसं थांबवलं?
पोलिसांचा प्राथमिक अंदाज काय?
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. गावात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे मोबाईल नेटवर्कचा आधार घेण्यात आला; मात्र घटना घडल्याच्या रात्री गावात बाहेरून कोणताही नवीन मोबाईल नंबर ॲक्टिव्ह झाला नाही आणि गावातून कोणीही बाहेर गेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निधीचा हरवलेला मोबाईल घरामागील जंगलाच्या वाटेवर बंद अवस्थेत सापडला. घरातील कोपरा न् कोपरा माहिती असलेल्या, तसेच निधीच्या ओळखीच्याच व्यक्तीने हा प्रकार केला असावा आणि अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असताना निधीने प्रतिकार केल्यानेच तिची हत्या झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
हे ही वाचा : कॉमेडियन पुलकित मणी यांना मंचावर बोलवणं आणि पीएम मोदी यांची मिमिक्री करणं हा अपमान?
कॅनडाला जाण्याची तयारी
निधी अभ्यासात अत्यंत हुशार होती आणि तिची पुढील शिक्षणासाठी कॅनडाला जाण्याची तयारीही पूर्ण झाली होती. मात्र, या घटनेने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या हत्येला एक महिना उलटून गेल्यानंतरही पोलिसांच्या हाती कोणताही ठोस धागा लागलेला नाही. 900 फिंगरप्रिंट्सचा गुंता सोडवणे आणि मारेकऱ्याचा शोध घेणे मांडवी पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले आहे. आरोपी बाहेरचा नसून गावातलाच असण्याची शक्यता असल्याने आणि तो अजूनही मोकाट फिरत असल्यामुळे गोदावडी गाव व आसपासच्या परिसरात प्रचंड भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे.
ADVERTISEMENT












