Crime News: झारखंडच्या सिंहभूम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवण बनवण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर, आरोपी पतीने मृतदेह झुडपांमध्ये फेकून दिला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि मंगळवारी (9 डिसेंबर) आरोपी पतीला अटक करण्यात आली. आरोपीचं नाव संजय शर्मा असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, घटनेतील मृत महिलेचं नाव निशा शर्मा असून तिचा मृतदेह सोमवारी मुसाबनी पोलीस स्टेशन हद्दीतील बेनासोल क्वार्टरजवळ आढळला.
ADVERTISEMENT
रागाच्या भरात साडीने गळा आवळला
पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, 7 डिसेंबर रोजी संध्याकाळी संजय शर्मा आणि त्याची पत्नी निशा शर्मा यांच्यामध्ये जेवण बनवण्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला. पुढे हा वाद इतका वाढला की, संजयने रागाच्या भरात निशाचा साडीने गळा आवळून तिची हत्या केली.
हे ही वाचा: लग्नानंतर हुंड्याची मागणी, शारीरिक छळ, पतीचे अनैतिक संबंध अन्... महिला पोलीस कॉन्स्टेबलचे पतीवर गंभीर आरोप
मृतदेह झुडुपांमध्ये फेकून दिला अन्...
त्यानंतर, आरोपीने पत्नीच्या हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी ती साडी जाळून टाकली आणि मृतदेह जवळच्या परिसरातील झुडुपांमध्ये फेकून दिला. गंभीर अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि पोलिसांना सुद्धा या प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यानंतर, पोलिसांनी तपासासाठी पथके तयार केली आणि तपास सुरू केला.
हे ही वाचा: अहमदनगर : तीन महिन्यांच्या बाळाला आई-वडिलांनी गळा दाबून संपवलं, मृतदेह मुळा नदीपात्रातील झुडपात फेकला
पोलिसांचा तपास
तपासादरम्यान, संशयास्पद पुरावे सापडल्यानंतर पोलिसांना मृत महिलेचा पती संजयवर संशय आला. त्यानंतर, पोलिसांनी आरोपीची कठोर चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी संजयने सांगितलेल्या ठिकाणी पोलिसांनी जाळलेल्या साडीचे तुकडे सुद्धा ताब्यात घेतले. रिपोर्ट्सनुसार, आरोपी संजय शर्मा हा मूळ बिहारमधील सिवान जिल्ह्याचा रहिवासी असून तो बऱ्याच काळापासून मुसाबनी येथे राहत होता. पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











