Crime News : उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील एका गावात रविवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 70 वर्षीय मौला देवी आणि त्यांचा 50 वर्षांचा मुलगा विजय मिश्रा हे दोघेही एकाच घरात राहात होते. नेहमीप्रमाणे सकाळी नातेवाइकांनी त्यांना आवाज दिला; मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी घरात जाऊन पाहिले असता धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. दोघांचेही मृतदेह खोलीत पडलेले आढळले. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
ADVERTISEMENT
घटनास्थळी तात्काळ पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. प्राथमिक तपासात दोघांनीही विषारी पदार्थ सेवन केला असण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. फॉरेंसिक पथकाने खोलीतील नमुने जप्त करत तपास सुरु केला आहे. मात्र अंतिम निष्कर्षासाठी पोस्टमॉर्टम आणि वैज्ञानिक तपासणी अहवाल महत्त्वाचा ठरणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : अंध आई-वडिल 4 दिवस मुलाच्या मृतदेहसह घरात राहिले, दुर्गंधी पसरल्यानंतर पोलीस पोहोचले अन्...
पैशांच्या वादामुळे घडली घटना?
गावकऱ्यांच्या माहितीनुसार, मौला देवी यांनी काही दिवसांपूर्वी घरातील धान विकून तब्बल एक लाख रुपयांचा निधी उभा केला होता. दरम्यान, घटनेच्या आदल्या दिवशी विजयची पत्नी अनीता देवी आपल्या माहेरहून घरी आली होती आणि काही वेळ थांबून पुन्हा निघूनही गेली होती. त्यामुळे पैशांवरून सासू–सून किंवा पती–पत्नीमध्ये काही वाद झाला असावा, असा संशय स्थानिकांमध्ये व्यक्त केला जात आहे. तथापि, या दाव्यांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
सिराथूचे पोलीस अधिकारी सतेंद्र तिवारी यांनी सांगितले की, “प्राथमिक तपासात दोघांनीही विषारी पदार्थ घेतल्याचे दिसत असले तरी ही आत्महत्या आहे की त्यामागे कुठला दुसरा गुन्हेगारी हेतू आहे, याबाबत स्पष्टपणे काही सांगता येत नाही. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत.” त्यांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूचे खरे कारण पोस्टमॉर्टम अहवाल आणि फॉरेंसिक तपासणीनंतरच निश्चित होईल. या दुहेरी मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मौला देवी आणि विजय मिश्रा यांच्या निधनामागील कारणे नेमकी काय, याची स्पष्टता येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











