Indore crime news : इंदौरमधील खजराना परिसरातील तपेश्वरी बाग कॉलनीमध्ये घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. 26 जुलै रोजी भाड्याच्या घरामध्ये राहून बँकेत काम करणाऱ्या पलक काशिव यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. खोलीत सर्वत्र धूर पसरलेला होता आणि जळालेल्या सामानाच्या खुणा दिसत होत्या. घटनास्थळ पाहता सुरुवातीला ही घटना गॅस गळतीमुळे झालेला अपघात किंवा आत्महत्या असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र पोलिसांनी कोणताही घाईघाईने निष्कर्ष न काढता तपास सुरू ठेवला. त्यानंतर आलेल्या पोस्टमार्टम अहवालाने संपूर्ण प्रकरणालाच वेगळे वळण दिले.
ADVERTISEMENT
गळा दाबून हत्या अन् पायलचा मृतदेह जाळला
पलक गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात नव्हत्या. त्यामुळे त्यांचा शोध घेतला जात असतानाच त्यांचा मृतदेह सापडला. पोस्टमॉर्टेम अहवालात पलक यांचा मृत्यू आगीमुळे झाला नसून त्यापूर्वीच गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून आग लावण्यात आली होती. यामुळे तपासाची दिशा पूर्णपणे बदलली. खजराना पोलीस ठाण्याच्या पथकाने एफएसएलच्या मदतीने घटनास्थळावरील पुरावे गोळा केले आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली.
हेही वाचा : प्रियकराशी बोलताना गोंधळ घालायचा, आईने निष्पाप मुलाला संपवलं, पतीने महिन्याने केला उलगडा
लग्नाच्या विषयावरून वाद सुरू अन् हत्येने शेवट
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण पेट्रोलचा डबा घेऊन घटनास्थळाच्या दिशेने जाताना दिसल्याने तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला. तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. त्याची ओळख ग्वाल्हेर जिल्ह्यातील डबरा येथील मयंक शाक्य अशी झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, मयंक आणि पलक हे गेल्या सुमारे पाच वर्षांपासून जवळचे मित्र होते. चौकशीदरम्यान आरोपीने दोघांमध्ये लग्नाच्या विषयावरून वाद सुरू असल्याचे सांगितले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पलक यांनी लग्नास नकार दिल्यानंतर संतापाच्या भरात आरोपीने त्यांचा गळा दाबून खून केला.
त्यानंतर ही घटना अपघात किंवा आत्महत्या असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी आरोपीने मृतदेहावर पेट्रोल टाकून आग लावल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. इंदौर पोलिसांच्या मते, हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करून तपासाची दिशाभूल करण्याचा आरोपीचा उद्देश होता. मात्र पोस्टमार्टम अहवाल, एफएसएल तपास आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे हा कथित कट उघड झाला. पोलिसांनी आरोपी मयंक शाक्य याला अटक करून हत्या, पुरावे नष्ट करणे आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्याची पुढील चौकशी सुरू असून ही हत्या पूर्वनियोजित होती का आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT












