अहमदनगर : जामखेड तालुक्यातील एका कला केंद्रावर चार जणांच्या टोळक्याने रविवारी रात्री कोयत्यांच्या धाकावर दहशत माजवली. थिएटर मालकाकडे दर महिन्याला एक लाख रुपये देण्याची मागणी करत त्यांनी खुर्च्या, टेबल आणि दुचाकींची तोडफोड केली. याचदरम्यान नृत्य सादर करणाऱ्या मुलींची छेडछाड केली असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
“आम्हाला दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे"
या प्रकरणी पीडित नृत्यांगनेने जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, रविवारी (दि. ५) रात्री सुमारे पावणेनऊच्या सुमारास शुभम लोखंडे, सतीश टकले, नागेश रेडेकर (सर्व रा. आष्टी) आणि अक्षय उर्फ चिंग्या मोरे (रा. जामखेड) हे कोयते घेऊन कला केंद्रात घुसले. “आम्हाला दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे, नाहीतर थिएटर बंद पाडू,” असा धमकीचा सूर त्यांनी लावला. त्यानंतर त्यांनी कोयत्याने खुर्च्या, टेबल आणि दोन दुचाकींची तोडफोड केली.
दरम्यान, आरोपींनी नृत्य करणाऱ्या मुलींची छेड काढत फिर्यादीचे कपडे फाडून तिचा अपमान केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याआधी सायंकाळी सुमारे सात वाजता आरोपींनी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लावलेले बॅनर फाडले तसेच बीड रोडवरील एका हॉटेलमध्येही तोडफोड केली होती.
थिएटर मालकाकडून पैसे उकळले?
फिर्यादीत असेही म्हटले आहे की, आरोपी हे वारंवार कला केंद्रात येऊन धमक्या देत असतात. ते नृत्य करण्यास भाग पाडतात, मात्र त्याचे पैसे न देता निघून जातात. तसेच थिएटर मालकाकडूनही पैशांची उकळत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
