kunal chandgude case :कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई-वडिलांच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवे खुलासे झालेले पाहायला मिळत आहेत. त्याने केवळ आयफोनसाठी टोकाचं पाऊल उचललं होतं का, की त्यामागे कुटुंबातील वाद आणि वाढलेले गैरसमज कारणीभूत होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुणालचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगिता चांदगुडे यांच्या नात्यात दरी निर्माण झाली होती का? याबाबतही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कुणालची मावशी कल्याणी बरडे यांनी मुंबई Tak सोबत संवाद साधला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : आदिवासी तरुणीने 'छात्रो की गूंज'मध्ये आवाज उठवला, आता राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र
आयफोनबाबत मावशीचा खुलासा
त्यांनी सांगितले की, कुणालच्या वडिलांचा आर्थिक पार्श्वभूमी गरीब नव्हती. ते ड्रायव्हर म्हणून काम करत असले तरी त्यांच्या कुटुंबाकडे शेती होती आणि त्यातून उत्पन्न मिळत होते. त्यामुळे कुणालला आयफोन घेऊन देण्यामागे मोठा आर्थिक प्रश्न असल्याचे आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. कुणालला शिक्षणासाठी आणि क्लाससाठी फोनची गरज होती, त्यामुळे त्याला फोन घेऊन देण्यात आला होता, असं त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : आदिवासी तरुणीने 'छात्रो की गूंज'मध्ये आवाज उठवला, आता राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र
'कुणालचे वडील घर सोडून गेल्याने संगीता त्रस्त होत्या'
कल्याणी बरडे यांनी सांगितले की, कुणालच्या आई संगिता या त्यांच्या सासरच्या मंडळींबाबत नाराज होत्या. कुणालचे वडील घर सोडून गेले होते आणि ते पुन्हा घरी येत नसल्यामुळे संगिता खूप त्रस्त होत्या. या सगळ्या प्रकरणात संवाद कमी झाला होता आणि गैरसमज मोठ्या प्रमाणात वाढले होते. जवळपास 22 ते 23 वर्षांचं वैवाहिक आयुष्य असताना आपल्या आवडीनिवडी किंवा नाराजीबाबत बोलण्याचा अधिकार संगिता यांना असल्याचे कल्याणी यांनी सांगितले. कोणाशी संवाद होत नसल्यामुळे त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत आपला संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला असावा, असंही त्या म्हणाल्या. या प्रकरणात जमिनीचा वादही असल्याचं त्यांनी सांगितलं; मात्र त्याबाबत अधिक माहिती आपल्या वडील, आई आणि मोठ्या बहिणीकडून मिळू शकते, असं त्यांनी स्पष्ट केलं.
कुणाल फक्त वडिलांना घरी आणण्यासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करत होता का, याबाबतही कल्याणी यांनी आपला अंदाज व्यक्त केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, कुणालने घटनेच्या काही दिवस आधी वडिलांशी फोनवर बोलताना, “पप्पा, मला सोडून तुम्ही कसे जाऊ शकता, तुम्ही माझ्याकडे या,” असं सांगितलं होतं. वडिलांनी आपल्या आई-वडिलांचा आणि बहिणीचा उल्लेख केला होता. मात्र कुणाल लहान असल्यामुळे कदाचित त्याला या परिस्थितीची पूर्ण कल्पना नव्हती, असं कल्याणी म्हणाल्या. त्यांनी स्वतः कुणालशीही याबाबत बोलून, अशा गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडतात, असं समजावलं होतं. कुणाल आपल्या वडिलांना पुन्हा घरी आणू इच्छित होता, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
घटनेच्या दिवशी कुणालचा अचानक फोन आला आणि त्याने “मी जात आहे, मला माफ करा,” असं सांगितल्याचं कल्याणी यांनी सांगितलं. त्याच्या बोलण्यातून त्याने काही टोकाचं पाऊल उचलण्याचा विचार केला आहे, असं आपल्याला आधी जाणवलं नव्हतं, असंही त्या म्हणाल्या. कुणालच्या घरात पैशांची कमतरता नव्हती, त्याची आई त्याच्यावर खूप प्रेम करत होती आणि वडीलही त्याच्यावर खूप प्रेम करत होते, असं त्यांनी सांगितलं. वडील त्याच्यासोबत राहत नसले तरी कुणालला काही झालं असतं तर त्यांना मोठा धक्का बसला असता, असं कल्याणी म्हणाल्या. त्यामुळे कुणालने हे जाणीवपूर्वक केलं की अचानक घडलेल्या घटनेतून हे सगळं घडलं, याबाबत आपल्याला पूर्ण माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT












