Pune Metro : बारामतीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित मुलगी शनिवारी रात्री आईच्या मोबाईलवरून एका मित्रासोबत मुलगी चॅट करत होती. या चॅटमधील काही गोष्टी आईच्या लक्षात आल्यानंतर दोघींमध्ये घरात वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात मुलगी घरातून बाहेर पडली. रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा सोसायटी परिसरात आणि मित्र-मैत्रिणींकडे शोध सुरू केला. ज्या व्यक्तीसोबत ती चॅट करत होती, त्याच्याशीही संपर्क करण्यात आला; मात्र तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
ADVERTISEMENT
हेही वाचा : चंद्रपूर : कोर्टाबाहेर भरदिवसा फायरिंग, डोक्यात गोळ्या झाडून तरुणाची हत्या; कारण काय?
मुलगी बिल्डिंगच्या बाजूला एक मुलगी मृतावस्थेत पडल्याची माहिती
रात्री बराच वेळ शोध घेऊनही मुलगी सापडली नाही. त्यानंतर पोलिसांकडे मिसिंगची तक्रार करण्यात आली. तिचे अपहरण झाले असावे, असा संशयही कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी तक्रार नोंदवून तिचा शोध सुरू केला. मात्र रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास स्वामी समर्थ बिल्डिंगच्या बाजूला एक मुलगी मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना 112 क्रमांकावरून मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृत मुलगी ही रोहित पवार यांच्या पीएची मुलगी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आणि फॉरेन्सिक टीमसह संबंधित पथकांनी तपास सुरू केला.
हेही वाचा : भारताच्या तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीत? Niti आयोगाचे धक्कादायक आकडे बघाच!
आत्महत्येचे प्रकरण असल्याचे पोलिसांचे मत
तपासादरम्यान स्वामी रेसिडेन्सीच्या पाचव्या मजल्यावरील टेरेसची पाहणी करण्यात आली. टेरेसचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे दिसून आले. स्थानिकांच्या मदतीने शिडीच्या साहाय्याने टेरेसवर प्रवेश केल्यानंतर तिथे मुलीची एक चप्पल आढळली. दरम्यान, इमारतीतील लिफ्टजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये रात्री साधारण 9 वाजून 58 मिनिटांनी मुलगी लिफ्टने वर जाताना दिसली. ती एकटीच वर गेल्याचे फुटेजमधून स्पष्ट झाले. तिच्या शरीरावर खरचटल्याच्या जखमा होत्या, तसेच डावा हात आणि डावा पाय फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले. प्राथमिक तपास आणि परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार तिने इमारतीवरून उडी मारल्याचे पोलिसांचे प्रथमदर्शनी मत आहे.
मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामती येथे पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. टेरेसवर तिच्यासोबत अन्य कोणी व्यक्ती होती का, याचाही तपास केला जात आहे. मात्र आतापर्यंतच्या तपासात तिला कोणी ढकलल्याचे किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीचा थेट सहभाग असल्याचे पुरावे समोर आलेले नाहीत. प्राथमिक तपासात हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी रुग्णालयात जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली असून पोलीस तपास गांभीर्याने करण्याची मागणी केली आहे. संपूर्ण घटनाक्रमात मुलगी घरातून बाहेर पडण्यापासून ते पार्किंगजवळ मृतावस्थेत सापडेपर्यंतच्या घटनांचा तपास केला जात आहे.
ADVERTISEMENT












