Dombivli Crime News : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे 18 हजार रुपयांच्या कर्जावरून एका सावकाराने कुटुंबाला धमकावल्याचा आणि त्रास दिल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात कर्जदाराच्या मुलाचा 13 ऑक्टोबर रोजी मानसिक धक्क्याने रुग्णालयात मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी सावकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्व येथील टिळकनगर पोलीस ठाण्यात आबिद सैयद (वय 42) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र सावकारी (नियमन) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सिंधुदुर्ग : बसमधून उतरली पण घरी पोहोचलीच नाही, नदीत सापडला मृतदेह, नंदिनीसोबत काय घडलं?
आरोपीने वाढत्या व्याजावरून कुटुंबाला त्रास दिला?
आरोपी बेकायदेशीरपणे सावकारी करत असल्याचा आरोप आहे. तक्रारदार शम्मू बापुमिया पिंजारी (वय 60) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबाने मे 2025 मध्ये आरोपीकडून 18 हजार रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाच्या अटींनुसार, 40 दिवस दररोज 300 रुपये परत करायचे होते. त्यानुसार कुटुंबाने रोख रकमेच्या स्वरूपात हप्ते भरले होते. आतापर्यंत एकूण 7 हजार 500 रुपये दिले असतानाही आरोपीने वाढत्या व्याजावरून कुटुंबाला त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : ज्ञानेश कुमारांचा बचाव कोण करतंय? CJP च्या आंदोलनातून कोणते सवाल?
धमक्यांमुळे तरुणाला मोठा मानसिक धक्का
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 ऑक्टोबर रोजी आरोपी कर्जदाराच्या घरी पोहोचला. त्यावेळी त्याने तक्रारदाराच्या मुलाला धमकावले आणि वाढीव व्याजापोटी तातडीने 20 हजार 500 रुपये देण्याची मागणी केली. दोन दिवसांत पैसे दिले नाहीत, तर नखे उपटून जखमांवर लाल मिरचीची पूड चोळेन आणि बोटे कापून टाकेन, अशी धमकी आरोपीने दिल्याचा आरोप आहे. या धमक्यांमुळे तरुणाला मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, 13 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कर्जाच्या वादातून कुटुंबाला धमकावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
तरुणाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली असून, आरोपी आबिद सैयद याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपांची चौकशी सुरू आहे. घटनेनंतर आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचा शोध सुरू असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 18 हजार रुपयांच्या कर्जावरून सुरू झालेल्या या वादात वाढीव व्याजाची मागणी, कुटुंबाला दिलेल्या धमक्या आणि तरुणाचा झालेला मृत्यू यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे.
ADVERTISEMENT












