चंद्रपूर : कोर्टाबाहेर भरदिवसा फायरिंग, डोक्यात गोळ्या झाडून तरुणाची हत्या; कारण काय?
चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. राजुरा शहरातील न्यायालयाबाहेर 20 ते 22 वर्षांच्या दोन तरुणांनी गोळीबार केला. यामध्ये एका 32 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चंद्रपूर : कोर्टाबाहेर भरदिवसा फायरिंग
तरुणाच्या थेट डोक्यात घातली गोळी
नेमकं कारण काय?
Chandrapur Crime, विकास राजूरकर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातील न्यायालय परिसरात सोमवारी (24 ऑगस्ट) सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. या खळबळजनक घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. विनोद उर्फ पापा जाधव (वय 32, रा. सोमनाथपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. न्यायालय परिसरातील एका नारळ पाण्याच्या दुकानाजवळ नेहमीप्रमाणे बसलेला असताना अचानक दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे संपूर्ण राजुरा शहर आणि परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे.
20 ते 22 वर्षांच्या तरुणांनी केला गोळीबार
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन 20 ते 22 वयोगटातील तरुणांनी विनोद जाधव याला लक्ष्य करत अगदी जवळून डोक्यात गोळी झाडली. गोळी लागताच विनोद रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला, तर दोन्ही आरोपी घटनेनंतर लागलीच दुचाकीवरून फरार झाले. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत गंभीर जखमी विनोदला तातडीने राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. तेथे उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा वेग संथ, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज
नाकाबंदी करत पंचनामा
घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस स्टेशनचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिसराची नाकाबंदी करत पंचनामा केला. ही हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली आणि हल्लेखोर कोण होते, याचा तपास पोलीस सध्या सर्व अंगांनी करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वेगाने सुरू असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
हे ही वाचा : Personal Finance: सोने की SIP? 10 वर्षांत कोण बनलं श्रीमंत?
एका महिलेसह तिघांचा बळी
दरम्यान, राजुरा शहरात यापूर्वीही गोळीबाराच्या अशा गंभीर घटना घडल्या असून त्यात आतापर्यंत एका महिलेसह तिघांचा बळी गेला आहे. आता थेट न्यायालय परिसरासारख्या गजबजलेल्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी सायंकाळच्या वेळी असा जीवघेणा हल्ला झाल्याने शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, पोलिसांनी आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी तीव्र मागणी स्थानिक जनतेकडून केली जात आहे.
