विजय बाबर, सोलापूर: कोल्हापूरातील गंगावेश तालमीत सराव केलेला आणि महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरलेला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख याला एका गंभीर प्रकरणात अटक करण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे. काही वर्षांपूर्वी पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी सामन्यात पंचांनी दिलेल्या वादग्रस्त निकालामुळे सिकंदर शेख हा प्रचंड चर्चेत आला होता. मात्र, आता याच सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी थेट शस्त्र तस्करी प्रकरणी अटक केली आहे. सीआयए पथकाने पपला गुर्जर टोळीला शस्त्र पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत चार जणांना अटक केली असून त्यामध्ये सिकंदर शेखचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 99 हजार रुपये रोख, एक पिस्तुल (0.45 बोर), चार पिस्तुल (0.32 बोर), काडतुसे, स्कॉर्पिओ-एन आणि एक्सयूव्ही या दोन गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी खरड (पंजाब) पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पपला गुर्जर टोळीशी थेट संबंध
एसएसपी हरमन हंस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अटक करण्यात आलेले आरोपी हरियाणा आणि राजस्थानात सक्रिय असलेल्या विक्रम उर्फ पपला गुर्जर टोळीशी थेट संबंधित आहेत. आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्रे आणून ती पंजाब आणि परिसरात पुरवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान यामध्ये तिघेजण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत तर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या सिकंदर शेखची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधल्याची माहिती हंस यांनी दिली.
दानवीरवर खून व दरोड्याचे गुन्हे
पोलीस तपासात उघड झाले की, या घटनेतील मुख्य आरोपी दानवीर याच्यावर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात खून, दरोडा, एटीएम फोड, आर्म्स अक्ट अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. तो पपला गुर्जर टोळीचा सक्रिय सदस्य असून, यूपी आणि मध्य प्रदेशातून शस्त्रं आणून पंजाबमध्ये पुरवण्याचे काम तो करत होता.
एअरपोर्ट चौकातून तिघांना अटक
24 ऑक्टोबर रोजी दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी एक्सयूव्ही गाडीत दोन शस्त्रे घेऊन मोहालीत आले होते. ही शस्त्रे सिकंदर शेखकडे देण्याचे ठरले होते, तर सिकंदरने ती नयागावातील कृष्ण उर्फ हैप्पी याला पुरवायची होती. पोलिसांनी एअरपोर्ट चौकातून तिघांना अटक केली. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून 26 ऑक्टोबर रोजी कृष्ण कुमार उर्फ हैप्पी यालाही अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून आणखी तीन पिस्तुल जप्त करण्यात आली.
महाराष्ट्र केसरीपासून शस्त्र तस्करीकडे
सिकंदर शेख हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू असून, त्याने आर्मीमध्ये क्रीडा कोट्यातून भरती घेतली होती, मात्र काही काळानंतर नोकरी सोडली. तो बीए पदवीधर, विवाहित असून गेल्या पाच महिन्यांपासून मुल्लांपूर गरीबदास येथे भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांच्या मते तो शस्त्र पुरवठा तस्करीत मध्यस्थाची भूमिका बजावत होता.
कुस्तीक्षेत्रात खळबळ
सिकंदर शेख हा कोल्हापूरातील गंगावेश तालमीत सरावलेला कुस्तीपटू असून, दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला होता. त्याच्या अटकेमुळे कुस्तीविश्वात आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT


 होम
होम राजकीय आखाडा
राजकीय आखाडा गुन्ह्यांची दुनिया
गुन्ह्यांची दुनिया शहर-खबरबात
शहर-खबरबात राशीभविष्य-धर्म
राशीभविष्य-धर्म पैशाची बात
पैशाची बात फोटो बाल्कनी
फोटो बाल्कनी हवामानाचा अंदाज
हवामानाचा अंदाज टॉपिक
टॉपिक











