चुलीवरुन पातेलं काढत होती आई, मागून चिमुकला येऊन बिलगला, उकळतं दूध सांडल्याने तान्हुल्याचा मृत्यू

हातात उकळत्या दुधाचे पातेले घेऊन जात असतानाच, खेळत असलेला छोटा मनू धावत आला आणि त्याने आनंदाने आपल्या आईच्या पायाला घट्ट मिठी मारली. मुलाने अचानक पाय ओढल्यामुळे सावित्री देवी यांचा तोल गेला. सावरण्याचा प्रयत्न करेपर्यंत त्यांच्या हातातील उकळत्या दुधाचे पातेले थेट मनूच्या अंगावर पलटी झाले.

Marathi News

Marathi News

मुंबई तक

12 Mar 2026 (अपडेटेड: 12 Mar 2026, 12:27 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

चुलीवरुन पातेलं काढत होती आई

point

मागून चिमुकला येऊन बिलगला

point

उकळतं दूध सांडल्याने तान्हुल्याचा मृत्यू

एका दोन वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. केवळ आईच्या प्रेमापोटी तिच्या पायाला मारलेली मिठी या लहानग्यासाठी मृत्यूचा सापळा ठरेल, असे कोणालाही स्वप्नातही वाटले नव्हते. आईच्या हातातून उकळत्या दुधाचे पातेले अंगावर पडल्याने या चिमुरड्याचा होरपळून मृत्यू झाला.  उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यातील सरायअकिल परिसरात ही मन सुन्न करणारी घटना घडली. 

हे वाचलं का?

हेही वाचा : तीन मुली झाल्या, दुसरं लग्न करण्याची परवानगी दे, सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

ही हृदयद्रावक घटना उस्मानपुर बिगहरा गावात घडली. या गावातील रहिवासी मंगल प्रसाद हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी रात्री मंगल प्रसाद आपल्या तीन मुलांना घेऊन शेजारच्या गावात एका कार्यक्रमासाठी गेले होते. घरी त्यांची पत्नी सावित्री देवी आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा मनू हे दोघेच होते. घरातील दैनंदिन कामे आटोपल्यानंतर सावित्री देवी यांनी रात्री नऊच्या सुमारास चुलीवर दूध गरम केले. दूध गरम झाल्यानंतर त्या पातेले घेऊन बाहेर ठेवण्यासाठी निघाल्या होत्या.

उकळत्या दुधाने हिरावले हसते-खेळते बालपण; गावात पसरली शोककळा

सावित्री देवी हातात उकळत्या दुधाचे पातेले घेऊन जात असतानाच, खेळत असलेला छोटा मनू धावत आला आणि त्याने आनंदाने आपल्या आईच्या पायाला घट्ट मिठी मारली. मुलाने अचानक पाय ओढल्यामुळे सावित्री देवी यांचा तोल गेला. सावरण्याचा प्रयत्न करेपर्यंत त्यांच्या हातातील उकळत्या दुधाचे पातेले थेट मनूच्या अंगावर पलटी झाले. उकळते दूध अंगावर पडताच मनू वेदनेने विव्हळू लागला आणि घरभर ओरडू लागला. आपल्या पोटच्या गोळ्याची ही अवस्था पाहून आईच्या काळजाचा ठोका चुकला आणि तिने मदतीसाठी एकच टाहो फोडला.

मुलाचा आणि आईचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. गंभीररीत्या भाजलेल्या मनूला तातडीने सरायअकिल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. नातेवाईक त्याला घेऊन रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयाकडे धावत होते, पण दुर्दैवाने वाटेतच मनूची प्राणज्योत मालवली. मंगळवारी सकाळी कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेविना आणि शवविच्छेदनाशिवाय कुटुंबियांनी मुलावर अंत्यसंस्कार केले. पोलीस स्थानकाचे प्रभारी वीर प्रताप सिंह यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाली असली तरी कुटुंबियांकडून कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, सावित्री देवी यांची अवस्था पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

वहिणी 'नाही' म्हटल्याने सलून चालकाने केले कांड, वहिणीसह चिमुकल्या पुतणींवर फेकले ॲसिड; पोलिसांनाही दिला गुंगारा
 

    follow whatsapp